युपीएचे अध्यक्ष व्हायला शरद पवार बाशिंग बांधून तयार?

युपीएचे अध्यक्ष व्हायला शरद पवार बाशिंग बांधून तयार?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राज्यसभा खासदार शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष होण्याची स्वप्न पुन्हा एकदा पडू लागली आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. याला कारण ठरले आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत पारित करण्यात आलेला प्रस्ताव.

मंगळवार, २९ मार्च रोजी दिल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक आघाडीची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक पार पडली. खुद्द शरद पवार यांच्या उपस्थितीत ही संपूर्ण बैठक पार पडली. यावेळी शरद पवारांना युपीएचे अध्यक्ष करावे असा ठराव मांडण्यात आला आणि तो संमतही झाला. विशेष म्हणजे या प्रस्तावाची मांडणी शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यामुळेच आता शरद पवार यांनाच युपीए अध्यक्ष होण्याची इच्छा आहे का? असा सवाल विचारला जात आहे.

हे ही वाचा:

आपल्या शरीरातही जाते या मार्गाने प्लास्टिक

मोहित कंबोज यांची मागणी; मशिदींवर बेकायदेशीर भोंगे हटवा!

जम्मू-काश्मीरमध्ये सीआरपीएफ कॅम्पवर पेट्रोल बॉम्ब हल्ला

राणा आयुब यांना विमानतळावर अडवले! १ एप्रिलला होणार ED चौकशी

देशातील विरोधी पक्षांना एकत्र करून त्यांचे नेतृत्व करण्यासाठी काँग्रेस असक्षम आहे असे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे म्हणणे आहे. शरद पवार हेच देशातील विरोधकांना एकत्र आणू शकतात आणि शरद पवारांचे नेतृत्वातच भाजपाला रोखणे शक्य आहे असे या ठरावात म्हटले आहे. या वेळी भाषण करताना पवारांनी भाजपावर टीकास्त्र डागले आहे.

पण या ठरावामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात एकत्र सत्ता उपभोगणाऱ्या महाविकास आघाडी सरकार मधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. या आधी शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील सामनाच्या माध्यमातून शरद पवारांना यूपीएचे अध्यक्षपद देण्याची भाषा केली होती. तेव्हाही काँग्रेसकडून त्याचा कडाडून विरोध करण्यात आला होता. आतादेखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पारित केलेल्या या प्रस्तावाला काँग्रेसच्या गोटातून विरोध होताना दिसत आहे.

Exit mobile version