राज्याच्या राजकारणात सध्या मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण हे मुद्दे चांगलेच गाजत आहेत. अशातच लवकरच आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत त्यामुळे या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, जालन्यातून ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे जनआक्रोश यात्रा काढत आहेत. या यात्रेदरम्यान लक्ष्मण हाके यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
मराठा ओबीसी प्रश्न राज्यात तीव्र स्वरुप घेत असताना हा वाद शरद पवारांनी सोडवायला हवा. मात्र, शरद पवारही जरांगेंची भाषा बोलत आहेत. ओबीसी आरक्षणावर शरद पवार मूग गिळून गप्प बसलेत. यावर शरद पवारांसह उद्धव ठाकरे यांनीही बोलायला हवं, अशी जोरदार टीका ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे आंदोलन बेकायदेशीर आहे. जरांगे हे पॉलिटिक्स स्क्रिप्ट वरती काम करत आहेत, असा टोला लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंना लगावला आहे. दंगली घडवण्याची ओबीसींची बॅक हिस्ट्री नसून महामानवांच्या पुतळ्याखाली बसून कधी शिवीगाळ केली नाही. जरांगे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करतात यावर शरद पवारांनी बोलायला हवे, असं म्हणत लक्ष्मण हाके यांनी जोरदार निशाणा साधला आहे.
हे ही वाचा:
अडीच तास पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला…
“यंदाचा अर्थसंकल्प २०४७ सालच्या विकसित भारताचा पाया रचणारा असेल”
एनसीईआरटीच्या पुस्तकात आता ‘हडप्पा संस्कृती’चा उल्लेख ‘सिंधू सरस्वती संस्कृती’
जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये लष्करी चौकीवर दहशतवाद्यांचा हल्ला; जवानांकडून चोख प्रत्युत्तर
जनआक्रोश यात्रेला जालन्यातील वडीगोद्री जवळील मंडल स्तंभापासून लक्ष्मण हाके यांनी सुरुवात केली आहे. यातून कोणालाही टार्गेट करण्याचा आमचा हेतू नसल्याचे ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राच्या ओबीसींच्या मनात स्वाभिमान आणि विश्वास निर्माण केला पाहिजे. गावगाड्यातील सर्व लोकांनी आता एकत्रित आलं पाहिजे. तुमचा आरक्षण वाचवायला आता फुले शाहू आंबेडकर येणार नाहीत असे म्हणत लक्ष्मण हाके यांनी जनाक्रोश यात्रेला सुरुवात केली आहे. तसेच राज्यात बोगस कुणबी नोंदी झाल्या आहेत. त्या किती झाल्यात हे सरकारने सांगावे, अशी मागणी यावेळी लक्ष्मण हाके यांनी केली.