मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह ह्यांनी शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. या पत्रानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणावरून राज्यातील जनतेच्या मनात प्रचंड आक्रोश आहे. राज्यातून गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. या पार्श्वभूमीवर रविवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पवार नेमकी काय भूमिका घेणार ह्याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. पवारांकडून काहीतरी ठोस पाऊले उचलली जाण्याची अपेक्षा राज्याच्या जनतेला होती. पण पवारांनी एवढ्या गंभीर आरोपांनंतर सुद्धा महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे नेते अनिल देशमुख ह्यांची पाठराखणच केली. या प्रकरणात काहीच धड ना बोलता पवारांनी फक्त टोलवाटोलवी केली.
काय म्हाणाले शरद पवार?
शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. तेव्हा त्यांनी परमबीर सिंह ह्यांच्या पत्राबद्दल काही निरीक्षणे नोंदवली. परमबीर सिंह ह्यांनी पत्र लिहून गृहमंत्र्यांवर आरोप केले. हे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत पण या आरोपांना कोणतेही प्रमाण नाही. सिंह ह्यांच्या पत्रावर त्यांची सही देखील नाही. त्यांनी १०० कोटी मागितल्याचा आरोप केला आहे पण हे १०० कोटी कसे दिले गेले, कोणाकडे दिले याचा कोणताच उल्लेख नसल्याचे पवारांनी म्हटले आहे. या सोबतच बदली झाल्यावर सिंह यांनी हे आरोप केले आहेत. बदलीमुळे सिंह नाराज होते म्हणूनच त्यांनी असे आरोप केल्याचे पवारांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
परमबीर सिंग यांच्या पत्राला अनिल देशमुखांचे पत्रकातून उत्तर
नारायण राणे यांचे ठाकरे सरकारवर टिकास्त्र; राष्ट्रपती राजवटीची केली मागणी
फडणवीस दिल्लीला आले आणि लेटर आले
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीत येऊन पत्रकार परिषद घेऊन गेले. परमबीर सिंह हे देखील दिल्लीत आले. त्यांनी माझ्याशी चर्चा केली. त्या नंतर त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. परमबीर हे अनेकांच्या संपर्कात असतील असे म्हणत पवारांनी फडणवीस आणि परमबीर यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला.
राजीनामा घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्याचा
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत विचारले असता शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवत हात झटकण्याचा प्रयत्न केला. मी आजच आग्र्यावरून आलो आहे. मी आतापर्यंत फक्त मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. इतर सहकाऱ्यांशी अजून कोणतीही चर्चा केलेली नाही. राजीनामा मागणे हे विरोधकांचे कामच आहे. राजीनामा घेण्याचा अधिकार सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा आहे. त्यांनी माझ्याशी या विषयात कोणतीही चर्चा केलेली नाही. आम्ही देशमुखांचे म्हणणे ऐकू. सहकार्यांशी चर्चा करून उद्यापर्यंत यासंबंधीचा निर्णय घेऊ असे पवारांनी सांगितले.
हे ही वाचा:
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन
मंत्र्याची खंडणी, साहेबाची नाराजी
ज्युलिओ रिबेरोंसारख्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हावी
हे प्रकरण गंभीर आहे. यात थेट पोलिसांनी धक्कादायक आरोप केले आहेत. या आरोपांमुळे पोलिस खात्याची प्रतिमा मलिन झाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. एका चांगल्या अधिकाऱ्यामार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. ज्युलिओ रिबेरोंसारखे अधिकारी आहेत, त्यांच्याकडून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी शरद पवारांनी केली आहे. तर या प्रकरणाचा महाराष्ट्रातील महाविकास आघडी सरकारवर कोणताही परिणाम होणार नसल्याचेही पवारांनी यावेळी स्पष्ट केले.