मुंबईसह राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह असून घरगुती गणपतींसह सार्वजनिक गणपतीसाठीही भाविकांची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असलेलं लालबाग सध्या गजबजून गेलं आहे. भाविकांसह अनेक राजकीय नेतेमंडळींनीही लालबागमधील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे. सिने कलावंत, राजकीय नेते अशा अनेकांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी उपस्थिती लावली आहे.
लालबाग राजाच्या चरणी लीन होण्यासाठी सोमवार, ९ सप्टेंबर रोजी सकाळीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांचे जावई सदानंद सुळे आणि नात रेवती सुळे हे ही उपस्थित होते. गणपतीच्या तिसऱ्या दिवशी, सोमवारी सकाळी शरद पवारांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. लालबाग राजाच्या दर्शनाला येण्यापूर्वी शरद पावर यांनी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचेही दर्शन घेतले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सुद्धा लालबाग राजाच्या दर्शनासाठी सोमवारी दुपारी येणार आहेत. तर, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी यापूर्वी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. तसेच, प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनीदेखील सहकुटुंब लालबाग राजाचं दर्शन घेतलं.
हे ही वाचा:
सोनसाखळी चोरट्यांना प्रतिकार करणाऱ्या भाजपा नेत्याची गोळ्या झाडून हत्या
सूरतमध्ये अल्पवयीन मुलांकडून गणेश मंडपावर दगडफेक; २७ जणांना अटक
हा कोल्हापूरच्या शाहू महाराज छत्रपतींचा अपमान नाही तर काय आहे?
‘सुरतेची लूट’ म्हणणाऱ्यांना इतिहास अभ्यासक सदानंद मोरेंची चपराक
शरद पवार हे दुसऱ्यांदा लालबाग राजाच्या दर्शनाला आले आहेत. यापूर्वी ज्यावेळी शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळी शरद पवार लालबागच्या राजाच्या चरणी लीन होण्यासाठी आले होते. त्यानंतर अनेक वर्षांनंतर यंदा शरद पवार लालबागच्या राजाच्या दर्शनाला दाखल झाले आहेत. तर, कोरोना काळात रक्तदान शिबिराचे आयोजन लालबागच्या राजाच्या मंडळाने केलं होतं, त्यावेळी देखील शरद पवार आले होते. मात्र, त्यावर्षी कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे मंडळाच्या वतीने गणपतीची स्थापना करण्यात आली नव्हती. फक्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं गेलं होतं.