पुन्हा भाकरी फिरवली; शरद पवार यांनी घेतला राजीनामा मागे

पत्रकार परिषदेत आपल्या कार्यकर्त्यांच्या आवाहनाचा मान राखून घेतला निर्णय मागे

पुन्हा भाकरी फिरवली; शरद पवार यांनी घेतला राजीनामा मागे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी अखेर आपला या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला. २ मे रोजी लोक माझे सांगाती या आपल्या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनप्रसंगी शरद पवार यांनी आपण अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर गेले तीन दिवस यावरून महाराष्ट्रात आणि देशभरात राजकीय नाट्य रंगले. अखेर वाय. बी. सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेऊन शरद पवारांनी आपण राजीनामा कार्यकर्त्यांच्या आवाहनाचा मान राखून मागे घेत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे या राजीनामा नाट्यावर आता पडदा पडला आहे.

शरद पवारांनी आपला हा निर्णय वाचून दाखविला. त्यात ते म्हणाले की, २ मे २०२३ रोजी लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या अनावरण समारंभावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील सुमारे ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भूमिका होती. पण मी घेतलेल्या निर्णयाने जनमानसांमध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी व माझे सांगाती असलेल्या जनतेत अस्वस्थता निर्माण झाली.

मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरिता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम व विश्वास असलेले कार्यकर्ते, असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने काहींनी प्रत्यक्ष भेटून आवाहन केले. त्याबरोबर देशभरातून महाराष्ट्रातून विविध राजकीय पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी, अशी आग्रही विनंती केली. लोक माझे सांगाती हे प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे.

माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे. मी पुनश्च अध्यक्षपद स्वीकारत असलो तरी संघटनेत कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षात संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल.

हे ही वाचा:

दहशतवादावरून जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानला सुनावले

‘द केरळ स्टोरी’ला विरोध म्हणजेच काँग्रेसचे दहशतवादाला समर्थन

अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेच्या बाता मारणाऱ्या पाकिस्तानमध्ये ५० हिंदूंचे धर्मांतर

दिलासा.. कोरोनाची उतरती भाजणी सुरु

यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमानसात पोहोचविण्यासाठी मी अधिक जोमाने काम करीन. आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यशापयशात सर्व प्रकारच्या आव्हानांशी मुकाबला करतेवेळी आपण माझे सांगाती राहिलात याबद्दल मी आपला कायम ऋणी राहीन. मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे पुनश्च जाहीर करतो.

Exit mobile version