कोरेगाव-भीमा येथील हिंसाचाराच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समन्स पाठवण्यात आले आहे. संबंधित घटनेची चौकशी करणाऱ्या कोरेगाव- भीमा चौकशी आयोगाने शरद पवार यांना साक्ष नोंदवण्यासाठी २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी मुंबईतील सुनावणीत हजर राहण्यास सांगितले आहे. निवृत्त न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील द्विसदस्यीय चौकशी आयोगाची मुंबई व पुण्यात होत आहे. २१ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत मलबार हिल येथील सह्याद्री शासकीय अतिथीगृहात ही सुनावणी पार पडेल.
आयोगाकडून आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांनाही पाचारण करण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी रोजी केवळ प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी त्यांना बोलावण्यात येणार आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) करत आहे. तरीही चौकशी आयोगाचे कामकाज सुरु असून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना यापूर्वीही मुंबईतील सुनावणीला हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले होते. मात्र, ते या चौकशीला उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे शरद पवार यांना पुन्हा एकदा समन्स पाठवण्यात आले आहे.
विवेक विचार मंचचे सदस्य सागर शिंदे यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणात शरद पवार यांची साक्ष नोंदवण्याचा अर्ज आयोगाकडे केला होता. त्यानुसार आयोगाने शरद पवार यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. भीमा-कोरेगाव घटनेनंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्त्वपूर्ण विधाने केली होती. त्यामुळे शरद पवार यांच्याकडे या घटनेसंदर्भात जास्त माहिती असण्याची शक्यता आहे. त्यामुळे शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात यावी, असे सागर शिंदे यांनी म्हटले होते.
हे ही वाचा:
बेरोजगारी, कर्जबाजारीमुळे तीन वर्षात २५ हजार आत्महत्या
कर्णधार रोहित शर्माच्या डावपेचांसमोर वेस्ट इंडिज संघ क्लिन बोल्ड
विधानसभा निवडणूक मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगींनी केला खास फोटो शेअर
‘व्यवसाय करणे हे सरकारचे काम नाही, जनतेला सुविधा पुरविण्याला प्राधान्य’
काही दिवसांपूर्वीच आयोगाने पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची साक्ष नोंदवली होती. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी हिंसाचार झाला होता. शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषद घेण्यात आली होती. तेव्हा रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. तसेच त्यावेळी विश्वास नांगरे पाटील हे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक होते. त्यामुळे त्यांचीही साक्ष घेतली जाणार आहे. २५ फेब्रुवारी रोजी केवळ प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी त्यांना बोलावण्यात आले आहे.