स्वातंत्र्यवीर सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा संबंध नाही. सावरकर यांना माफीवीर म्हणणेही योग्य नाही, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विरोधकांच्या बैठकीत मांडली आहे. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधीही उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची मोट बांधण्याकरिता दिल्ली येथे विरोधी पक्षांची सोमवारी रात्री एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला स्वतः सोनिया गांधी, अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी तसेच शरद पवार यासोबत अन्य समाजवादी, जेडीयु खासदार उपस्थित होते. परंतु, राहुल गांधी यांनी सावरकरांवर केलेल्या टीकेमुळे उद्धव सेना नाराज असून ठाकरे गटाने या बैठकीकडे पाठ फिरवली होती. उद्धव सेनेच्या याच नाराजीचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीत मांडला.
सावरकरांना माफीवीर म्हणणे योग्य नाही. तसेच सावरकर आणि संघ यांचा संबंध नाही. आपल्यासमोर इतर अनेक महत्त्वाचे मुद्दे असून आपण त्यावर चर्चा करायला हवी. अशी भूमिका शरद पवारांनी मांडली. त्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांनी आपण शरद पवारांच्या मताचा आदर करतो, असे बैठकीत सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला जोडून ठेवण्यासाठी काँग्रेस यापुढे सावरकरांच्या विषयाला बगल देणार असल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली.
हे ही वाचा:
नाटू नाटू गाण्याचे प्रसिद्ध संगीतकार एम. एम. किरवाणींना झाला कोरोना
बोरिवलीत राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन
एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक पुन्हा चर्चेत
देशात चर्चा असलेल्या गुंड अतीक अहमदला आज काय शिक्षा होणार? फाशीची मागणी
राहुल गांधी यांनी खासदारकी रद्द झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांना विचारण्यात आले की, दोन वर्षांच्या तुरुंगवासासंदर्भात माफी मागणार का, त्यावर मी सावरकर नाही, गांधी आहे. गांधी माफी मागत नाहीत, असे विधान केले होते. त्यावरून त्यांच्यावर सर्वत्र टीका झाली. भाजपाने तर टीका केलीच पण उद्धव ठाकरे यांनीही मालेगावमधील भाषणात राहुल गांधींवर टीका केली. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा आता संपूर्ण देशभरात गाजत आहे.