राज्यात लवकरच आता विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार असून या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून धुसफूस सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचा हट्ट आहे की, चार भिंतीच्या आड तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवावा. तर, दुसरीकडे काँग्रेसची भूमिका वेगळी आहे. आधी निवडणुकांना सामोरं जाऊ मग मुख्यमंत्री ठरवू अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवारांनी मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदासाठी हालचाली करत असताना आपल्याकडून कुणीही चेहरा नाही, स्वतःही मुख्यमंत्री होणार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चर्चांबाबत मोठं भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, “आमच्याकडून कोणालाही मुख्यमंत्रिपदामध्ये रस नाही. आम्हाला कुणालाही मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून प्रोजेक्ट करायचं नाही. आम्हाला फक्त महाराष्ट्रातील सत्तेत परिवर्तन हवं आहे. महाराष्ट्राच्या सत्तेत परिवर्तन करून एका विचाराने राज्यातील जनतेला उत्तम प्रशासन द्यायचं हीच आमची इच्छा आहे. त्यामुळे कोण असावं आणि कोण नसावं? हा प्रश्न नाही. आम्ही कोणीही असणार नाही. तसेच माझा तर प्रश्नच नाही,” अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे. यामुळे महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू असताना शरद पवारांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
हे ही वाचा :
बदलापूर; आरोपीची आई म्हणते, ‘मुलगा दोषी असल्यास फाशी द्या’
बदलापूर प्रकरणात आता शाळेचे व्यवस्थापनही आरोपी; पॉक्सोअंतर्गत गुन्हा
मनू भाकरला ‘पॅरिस’स्पर्श; पुरस्कार, बक्षिसांमुळे संपत्तीत भरभक्कम वाढ!
अनिल अंबानींवर सेबीची कारवाई; पाच वर्षांसाठी बंदी, ठोठावला २५ कोटींचा दंड
मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरेंची भूमिका
काही दिवसांपूर्वी मुंबईत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की, “राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, मी त्यांना पाठींबा देतो.” त्यानंतर गुरुवार, २२ ऑगस्ट रोजी त्यांनी म्हटलं होतं की, बंद दाराआड तरी मविआने चेहरा ठरवावा.
मुख्यमंत्रीपदावरून काँग्रेस नेते नाना पटोले काय म्हणाले?
“महाविकास आघाडी जनतेच्या आशीर्वादाने सत्तेत आली तर आमच्या पक्षाचे हायकमांड जे काही ठरवतील त्या प्रमाणे मुख्यमंत्री होणार. त्यामुळे हा विषय आता नाही,” असं नाना पटोले यांनी म्हटलं.