संख्याबळाच्या आधारेच मुख्यमंत्री ठरणार!

शरद पवार यांची पुन्हा पलटी

संख्याबळाच्या आधारेच मुख्यमंत्री ठरणार!

राज्यात लवकरच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्यावरून कलह सुरू असल्यचे चित्र वारंवार समोर आले आहे. यावर पुन्हा एकदा शरद पवारांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबद्दल भाष्य केले आहे. मुख्यमंत्री चेहऱ्याचा आता विचार करण्याचे काहीच कारण नाही असं शरद पवारांनी म्हटलं आहे.

शरद पवार म्हणाले की, “मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत आताच आग्रह धरण्यात काही अर्थ नाही. मुख्यमंत्रीपदाबाबतीत महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल. आकड्यांच्या आधारावर विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण हे ठरेल. याला आता महत्त्व नाही. सध्या महाविकास आघाडीला बहुमत मिळेल अशी स्थिती आहे. तसे वातावरण राज्यात आहे. तसेच, लोकांच्या पाठिंब्यानंतर एक स्थिर सरकार देणं महत्त्वाचं आहे. स्थिर सरकार देणं, हे आमचे उद्दिष्ट्य आहे,” अशी भूमिका शरद पवारांनी स्पष्ट केली आहे.

पुढे ते असेही म्हणाले की, मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत विचार करण्याचं आत्ताच काही कारण नाही. संख्याबळानंतर याचा विचार होईल. अनेक वेळेला असं घडलं आहे. नेतृत्त्व कोणी करायचं हे निवडणूक झाल्यानंतर संख्या असेल तेव्हा निर्णय घ्यायचा असतो. १९७७ साली आणीबाणीच्या नंतर निवडणूक झाली. त्या निवडणुकीला कोणालाही पुढं केलेलं नव्हतं. जयप्रकाश नारायण यांनी सांगितलं, आणीबाणीला विरोध करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं. सर्वजण एकत्र आले, त्यानंतर निवडणुका झाल्यावर मोरारजी देसाई यांचं नाव जाहीर केलं, निवडणुकीत मत मागताना मोरारजी देसाई यांचं नाव कुठेही जाहीर केलेलं नव्हतं. त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे अशी काही आवश्कता नाही, आम्ही सर्वजण एकत्र बसून लोकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर एक स्थिर पर्याय सरकार या राज्याला देऊ, असं शरद पवारांनी यावेळी म्हटलं आहे.

हे ही वाचा..

टेक्सासमध्ये भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू

कंदाहार अपहरणावरील वेबसीरिजमध्ये दिसणार इस्लामी अतिरेक्यांची खरी नावे

…तर छत्रपतींचा पुतळा पडला नसता !

आरजी कर रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष मोठ्या रॅकेटचा भाग

शरद पवारांनी संख्याबळावरून निर्णय घेण्याची भूमिका ठरवली असली तरी काही दिवसांपूर्वी मुंबईत महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रि‍पदाच्या चेहऱ्याबाबत भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की, “राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, मी त्यांना पाठींबा देतो.” त्यानंतर गुरुवार, २२ ऑगस्ट रोजी त्यांनी म्हटलं होतं की, बंद दाराआड तरी मविआने चेहरा ठरवावा. दुसरीकडे काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी जनतेच्या आशीर्वादाने सत्तेत आली तर आमच्या पक्षाचे हायकमांड जे काही ठरवतील त्या प्रमाणे मुख्यमंत्री होणार. त्यामुळे हा विषय आता नाही.

Exit mobile version