शरद पवारांनी नेहमीप्रमाणे अजित पवारांना डावललं?

राजकारणाच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर शरद पवारांनी अजित पवारांना साईड लाईन करणं नवं नाही

शरद पवारांनी नेहमीप्रमाणे अजित पवारांना डावललं?

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात शरद पवारांनी ‘आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे’ असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर २ मे २०२३ रोजी शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मचरित्राची सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली. या प्रकाशन सोहळ्यात शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्ती जाहीर केली. पुढे कार्यकर्त्यांचा आग्रह लक्षात घेऊन शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला. त्यामुळे शरद पवारांनी भाकरी फिरवली या चर्चांना पूर्णविराम मिळाला. मात्र, अखेर आता कार्यकारी अध्यक्ष पदाची धुरा सुप्रिया सुळे यांना सोपवून शरद पवारांनी खरोखर भाकरी फिरवली असं म्हणता येईल.

दोन कार्यकारी अध्यक्ष नेमून पवारांनी पक्ष वाढीची जबाबदारी वाटून दिली आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना राज्य वाटून दिली असून महाराष्ट्राची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात अजित पवारांसारखा खमका आणि प्रसिद्ध चेहरा राष्ट्रवादीकडे असताना त्यांना डावलून शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांना ही जबाबदारी का दिली असावी? अजित पवारांना साईड लाईन का केलं असावं? असे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत.

राजकारणाच्या इतिहासात डोकावून पाहिलं तर शरद पवारांनी अजित पवारांना साईड लाईन करणं किंवा काकांनी पुतण्याला डच्चू देणं हे काही नवं नाही. यापूर्वीही अनेकदा असं घडलं आहे.

काही महिन्यांपूर्वी हिवाळी अधिवेशन काळात अजित पवारांनी छत्रपती संभाजी राजेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यात रान उठलं आणि अजित पवारांच्या वक्तव्याला राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी पाठींबा दर्शवला होता. तेव्हाही शरद पावर हे अजित पवारांची पाठराखण करतील अशी अपेक्षा होती. मात्र, त्यावेळी शरद पवारांनी अजित पवारांची चांगलीच कोंडी केली होती.

साधारण ९० च्या काळात काँग्रेसच्या सत्तेची धुरा पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडे असताना त्यांनी महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदावर असलेल्या शरद पवारांना संरक्षण मंत्रिपद देत केंद्रात बोलावलं. मात्र, त्यासाठी संसदेचा सदस्य असणं आवश्यक होतं. तेव्हा काही महिन्यांपूर्वीचं बारामतीमधून अजित पवार खासदार म्हणून निवडून आले होते. पण, शरद पवारांना केंद्रात संरक्षण मंत्री पद मिळावं म्हणून त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. पुढे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून ते आमदार झाले. तेव्हाही शरद पवारांनी केंद्रातील मंत्रीपदासाठी अजित पवारांची खासदारकी हिसकावून घेतली होती.

युतीमध्ये ज्यांच्या जास्त जागा त्यांना सत्तेतील किंवा विरोधी पक्षात असतानाही मोठं पद दिलं जात. २००४ साली झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या जास्त जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे २००४ साली अजित पवार मुख्यमंत्री पदी बसणार हे जवळपास निश्चित होतं. मात्र, तेव्हाही अजित पवारांना डावलून कॉंग्रेसकडे मुख्यमंत्री गेलं. पुढे २०१० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचं नाव आदर्श घोटाळ्यात आलं आणि त्यांनी राजीनामा दिला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आमदारांची संख्या अधिक होती. त्यामुळे मुख्यमंत्री पदी राष्ट्रवादीचा उमेदवार येणार असं वाटत असताना काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री बनले आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपदावर समाधान मानावे लागले.

पुढे ७२ हजार कोटींचा सिंचन घोटाळा समोर आला आणि त्यात अजित पवारांचे नाव समोर आले. यावेळी अजित पवारांच्या बाजूने पक्ष उभा राहिल्याचे चित्र फारसे दिसले नाही. शरद पवारही फारसे ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले दिसले नाहीत.

अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना डावलत शरद पवारांनी नेहमी रोहित पवारांना पुढे आणल्याचं ज्ञात आहे. शिवाय दुसरीकडे अजित पवारांना बाजूला करून सुप्रिया सुळे यांना राजकारणाच्या मंचावर प्रकाशझोतात आणण्याचे प्रयत्न सातत्याने दिसून येत आहेत.

हे ही वाचा:

घनदाट जंगलात ११ महिन्यांच्या बाळासह ४० दिवसानंतरही ४ मुले राहिली जिवंत

मंदिरात नमाज पठण करणाऱ्या व्यक्तीला अटक

‘लोक आग्रहास्तव सुप्रिया सुळे कार्याध्यक्षा पदी’

शरद पवारांनी भाकरी फिरवली; कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेलांची वर्णी

२०१९ मध्येही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी शपथ घेऊन सरकार स्थापन केलं यामागे शरद पवारांचा हात असल्याच्या चर्चा आहेत. काही तासांतचं हे सरकार कोसळलं मात्र शरद पवार यात कधीच पुढे आले नाहीत. अजित पवारांना मात्र त्यांनी या खेळातही एकटं पाडलं. पुढे २०१९ मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची संधी देत अजित पवारांच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद सोडलं.

आताही लोक आग्रहाखातर सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्षा केल्याचे शरद पवार म्हणाले. अजित पवार विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे, असं ठरवून शरद पवारांनी या नाराजी नाट्यावर तात्पुरता पडदा टाकला असला तरी सातत्याने साईड लाईन केलेल्या अजित पवारांची पुढची खेळी कशी असेल? याकडे लक्ष असणार आहे.

Exit mobile version