युपीए अध्यक्षपदासाठी संजय राऊतांनी पुन्हा उचलली पवारांची तळी

युपीए अध्यक्षपदासाठी संजय राऊतांनी पुन्हा उचलली पवारांची तळी

शिवसेनेचे खासदार आणि शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी अर्थात युपीएबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी युपीएचं पुनर्गठन व्हावं, असं म्हटलंय. इतकच नाही तर युपीएचं अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे द्यावं, असंही संजय राऊत म्हणाले आहेत. राऊत यांनी या मुलाखतीत युपीएच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. युपीएचं नेतृत्व बदलून, ते अशा हाती देण्यात यावं ज्यांना विरोधक स्वीकारतील, असंही राऊत म्हणाले आहेत.

राऊत म्हणाले, ‘महाराष्ट्रात जो प्रयोग झाला आहे, तो उत्तम आहे. संपूर्ण देश आमच्याकडे पाहतोय. आम्ही वारंवार आव्हान केलं आहे की, युपीएचं पुनर्गठन केलं पाहिजे’. संजय राऊत यांना विचारण्यात आलं की, तुम्ही युपीएचे घटक पक्ष नाही. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “आता आम्ही एनडीए (राष्ट्रीय लोकशाही आघाडी)तून बाहेर पडलो आहोत. अकाली दलही एनडीएतून बाहेर पडलाय. ममता बॅनर्जीही युपीए किंवा एनडीएमध्ये नाहीत. असे अनेक प्रादेशिक पक्ष आहेत जे एनडीए किंवा युपीएचे घटक नाहीत. ते युपीएमध्ये का नाहीत हा संशोधनाचा विषय आहे”.

हे ही वाचा:

वाझे प्रकरणात शिवसेना एकाकी, मित्रपक्ष झाले आक्रमक

वाझे प्रकरणात इनोव्हा, दोन मर्सिडीज नंतर प्राडोची एन्ट्री

२४ तासांत महाराष्ट्राने नोंदवले आजवरचे सर्वाधिक कोरोना रुग्ण

संजय राऊत यांच्या विधानानंतर काही तथ्य समजून घेणे आवश्यक आहे. युपीएचे अध्यक्षपद हे काँग्रेस व्यतिरिक्त कोणत्याही पक्षाकडे जाऊ शकत नाही. कारण, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जेंव्हा काँग्रेस सकट सर्व विरोधी पक्षांचा पराभव झाला तेंव्हासुध्दा काँग्रेस पक्षाला जवळपास २०% मतं आणि ५२ जागा मिळाल्या होत्या. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ १.३०% मतं आणि पाच जागा मिळाल्या होत्या. केवळ मतांचा विचार केला तर काँग्रेस पक्षाला वीस कोटी लोकांनी मतदान केलं होतं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निव्वळ ८५ लाख मतं मिळाली होती. या परिस्थितीत शरद पवारांना युपीएच अध्यक्षपद मिळणं जवळपास अशक्य असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

Exit mobile version