महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा तडाखा बसला. गेल्या निवडणुकीत ५४ जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादीला यावेळी केवळ १० जागा जिंकता आल्या. अर्थात, त्यातून बाजूला झालेल्या अजित पवारांनी ४१ जागांवर विजय मिळविला. या सगळ्या घडामोडींवर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार कराडमधून बोलत होते.
पवार म्हणाले की, लाडक्या बहिणींसाठी करण्यात आलेली योजना सत्तेत आलो नाही तर बंद होईल, असा प्रचार महायुतीकडून करण्यात आला. त्यामुळे लोकांनी आमच्या विरोधात मतदान केले असावे. दुसरीकडे या निवडणुकीत महिलांचे मतदान वाढले आहे, असे आकडेवारीवरुन दिसत आहे. तो फायदा महायुतीला मिळाल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेमुळे मतांचे ध्रुवीकरण झाले. त्याचा फायदा महायुतीला झाला.
ते म्हणाले की, ‘काल निकाल लागला आज मी कराडमध्ये आहे. हा निकाल लागल्यावर एखादा घरी बसला असता. पण मी घरी बसणार नाही. आमच्या तरुण पिढीला हा निकाल लागेल असं वाटलं नव्हतं. त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. त्यांना पुन्हा उभं करणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, नव्या जोमाने कर्तृत्वान पिढी उभं करणं हा माझा कार्यक्रम राहील.
हे ही वाचा:
पंत ठरला श्रीमंत, आयपीएलच्या इतिहासातील महागडा खेळाडू!
कोक्राझारमधील राय मोना राष्ट्रीय उद्यानातून तीन शिकारींना अटक
सैन्य दलात सायबर, आयटी डोमेन तज्ञांची होणार भरती
वंदे भारत गाड्यांवर दगडफेक ; दोघांना अटक
बारामतीत अजित पवारांसमोर युगेंद्र पवार याला उभे करणे ही चूक होती का, यावर पवार म्हणाले की, कुणी तरी बारामतीत उभं राहणं आवश्यक होतं. तिथं कुणीलाही उभं केलं नसतं तर महाराष्ट्रात मेसेज काय गेला असता. दोघांची तुलना होऊ शकत नाही हे आम्हाला माहीत होतं. अजित पवार यांचं अनेक वर्षापासूनचं राजकारण, सत्तेतील सहभाग आणि दुसऱ्या बाजूला नवखा तरुण हे आम्हाला माहीत आहे.
निकालानंतर विरोधी पक्षनेता निवडणे शक्य होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तेवढे संख्याबळ विरोधी पक्षांकडे नाही. त्याविषयी पवार म्हणाले की, १९८० रोजी आमचे ५८ आमदार निवडून आले होते. त्यानंतर मी परदेशात गेलो होते. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री ए.आर.अंतुले यांनी आमचे ५२ आमदार फोडले होते. तेव्हा आमच्याकडे फक्त सहा आमदार शिल्लक राहिले. तेव्हा विरोधी पक्षनेता नव्हता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत विजय मिळवला. आताही विरोधी पक्षाकडे संख्या नसली तरी विरोधी पक्षनेता असायला हवा, असे शरद पवार यांनी म्हटले.