पवारांनी सांगितले आणखी १-२ दिवस थांबा!

शरद पवारांचा कार्यकर्त्यांशी संवाद

पवारांनी सांगितले आणखी १-२ दिवस थांबा!

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदावरून राजीनामा देण्याची घोषणा करताच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा यासाठी अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते. राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले होते. अखेर शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरबाहेर कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

‘कार्यकर्त्यांची भावना दुर्लक्षित केली जाणार नाही. जो काही निर्णय मी घेतला तो पक्षाच्या भविष्यासाठी घेतला आहे. उद्या पक्षाचं कामकाज असं चालावं, त्यातून नवीन नेतृत्व मजबूत करावं हा माझा हेतू होता, असे निर्णय घेताना तुम्हाला विश्वासात घेऊन निर्णय घेण्याची गरज होती, पण ती माझ्याकडून घेतली गेली नाही. चर्चा केली असती तर तुम्ही विरोध केला असता. मी बैठक घेईन, त्यानंतर अंतिम निर्णय एक ते दोन दिवस घेणार. कार्यकर्त्यांची भावना दुर्लक्षित केली जाणार नाही. तुमच्यावर आंदोलन करण्याची वेळ येणार नाही,’ असं शरद पवार म्हणाले.

हे ही वाचा:

मी दिलेला सल्ला शरद पवारांच्या पचनी पडेल का? उद्धव ठाकरे यांनी मारला टोमणा

लष्कराचे हेलिकॉप्टर चिनाब नदीत कोसळले

मुंबईतील बिबटे माणसांसोबत जीवन जगू शकतील का?

‘गो फर्स्ट’च्या वैमानिकांची एअर इंडिया, इंडिगोच्या ‘कॉकपिट’वर नजर

शरद पवारांच्या निवृत्त होण्याच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत होती. काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने शरद पवार यांना पत्र लिहून राजीनामा मागे घेण्याची मागणी केली होती. अखेर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून दोन दिवसात निर्णय देण्याचे सांगितले आहे. शरद पवारांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, जर एक दोन दिवसांत शरद पवार काय तो निर्णय घेणार असतील तर ५ मे रोजी नेमके काय होणार आहे, याविषयी शंका निर्माण झाली आहे. ५ मे रोजी नवा अध्यक्ष निवडला जाईल. अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे शर्यतीत असल्याचे वृत्त होते. पण, आता एक दोन दिवस थांबण्यास सांगितल्यामुळे नेमका निर्णय कधी होणार, तो नव्या अध्यक्षाबाबत होणार आहे की, शरद पवारांच्या निर्णयाबाबत होणार आहे याबाबत संभ्रम आहे.  

Exit mobile version