शरद पवारांनी पुन्हा केला बाबासाहेब पुरंदरेंना विरोध

शरद पवारांनी पुन्हा केला बाबासाहेब पुरंदरेंना विरोध

ठाणे येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेल्या सभेतील वक्तव्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलीच झोंबली असून त्यावर दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच प्रत्युत्तर देत पुन्हा एकदा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली.

जिजाऊंनी शिवरायांचे व्यक्तिमत्त्व घडविले पण पुरंदरेंनी दादोजी कोंडदेव यांनी शिवरायांना घडविल्याचे म्हटले. त्याला माझा सख्त विरोध होता आणि आहे, असे सांगून पवार म्हणाले की, जेम्स लेनने जे लिखाण केले त्यात ही माहिती पुरंदरेंकडून घेतली असा उल्लेख आहे. एका लेखकाने गलिच्छ लिखाण केले त्याला माहिती पुरंदरेंनी पुरवल्याचा उल्लेख आहे. त्याचा खुलासाही पुरंदरेंनी केला नाही. त्यावर टीका झाली त्याचा मला अभिमानच वाटतो.

या सभेत महागाई, बेरोजगारी तसेच भाजपाच्या कार्यपद्धती विरोधात राज ठाकरे यांनी का भाष्य केले नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी विचारला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात घेतलेल्या सभेनंतर महाविकास आघाडीचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांच्यात प्रचंड अस्वस्थता असल्याचे चित्र महाराष्ट्रात दिसते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रामुख्याने राज ठाकरे यांनी शरसंधान केल्यामुळे बुधवारी शरद पवार यांनीच थेट पत्रकार परिषद घेत राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.

शरद पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव मी घेत नाही असे ते म्हणाले. दोन दिवसांपूर्वी अमरावतीला होतो. ते भाषण मागवलं तर शिवाजी महाराजांचं योगदान यावर माझं भाषण होतं. अनेक गोष्टी सांगितल्या. सकाळी उठल्यावर मी न्यूजपेपर वाचतो. त्यांनी वाचले नसेल त्यामुळे मी बोललो ते त्यांना लक्षात आले नसेल. मी त्यांना दोष देणार नाही.

फुले आंबेडकर शाहू यांचाच उल्लेख केला जातो त्याचा अभिमान आहे मला. या राज्यात शिवछत्रपतींच्या संदर्भातील सविस्तर कुणी लिहिलं असेल ते फुलेंनी. म्हणून या तिघांच्या संबंधीचा उल्लेख करणं शिवछत्रपतींच्या विचारांची मांडणी करण्याचाच भाग आहे.

हे ही वाचा:

‘मुंब्र्यात कोंबिंग ऑपरेशन करा’

नवाब मलिकांची १४७ एकर जमीनीसह आठ मालमत्ता जप्त

न्यूयॉर्क सबवे स्टेशनवर गोळीबार, १३ जखमी

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील लीपिकाला गाडीने उडवले

 

एखादी व्यक्ती वर्षा सहा महिन्यांनी स्टेटमेंट देते. ते गांभीर्याने घ्यायचे नाही, असे म्हणत पवारांनी आपल्या पत्रकार परिषदेची सुरुवात केली. ते पुढे म्हणाले की, खऱ्या अर्थाने प्रश्न होते महागाई बेरोजगारी. याबद्दल राज ठाकरे यांच्या सभेत उल्लेख नाही. सामान्य जनतेच्या सुखदुःखाशी संबंधित उल्लेख नाही. त्यामुळे या भाषणाबद्दल बोलावेसे वाटत नाही.

सोनिया गांधींसंदर्भात बोलले. माझं त्याबद्दल मत निश्चित होतो. मी पंतप्रधानपदावर जाऊ इच्छित नाही, हे जाहीर केल्यावर प्रश्न संपला. आमची मागणी पंतप्रधानपदाबद्दल होती. सोनियाजींनी त्याचा खुलासा केल्यावर वाद राहिलाच नाही, असेही पवार म्हणाले.

पवार म्हणाले, मी नास्तिक आहे, असे राज ठाकरे म्हणतात पण मी एका मंदिरात जातो, निवडणुकीआधी तिथे नारळ फोडतो. पण मी त्याचा गाजावाजा करत नाही. अजित पवारांवर ईडीची धाड पडली पण सुप्रिया सुळेंवर पडली नाही, या प्रश्नावर शरद पवार उखडले. ते म्हणाले की, अजित पवार हे माझ्यासाठी वेगळे आहेत का? अजित पवारांसंदर्भातील आरोप पोरकट आहे, प्रश्नही पोरकट आहे.

Exit mobile version