राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बोलावली होती. या बैठकीत शरद पवारांच्या नेतृत्वात अनेक निर्णय घेण्यात आले. शरद पवारांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. तर, दोन खासदार आणि नऊ आमदारांचे निलंबन करण्यात आले आहे.
राष्ट्रवादीच्या केंद्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ८ ठरावांना मान्यता देण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यकारिणीने शरद पवार यांच्या नावाला मान्यता दिली. तसेच सरकारमध्ये सामील झालेल्या नऊ आमदारांनाही निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे यांचे राष्ट्रवादीतून निलंबन करण्यात आलं आहे.
“देशातील २७ राज्यांचे राष्ट्रवादी पक्षाचे युनिट हे शरद पवार यांच्या सोबत आहे. महाराष्ट्रातील पक्षाचे नेते सुद्धा शरद पवार यांच्यासोबत आहे. महाराष्ट्रातील आमदार म्हणजे पक्ष नव्हे,” असं पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं आहे.
यावेळी शरद पवार यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली. “सर्व नेते बैठकीसाठी आले, याचा आनंद आहे. पक्षाला वाचवण्याचं काम ते करत आहे. एवढ्या मजबुतीने काम करण्याची मानसिकता सहकाऱ्यांकडून अपेक्षित होती. आजची बैठक ही उत्साह वाढवणारी आहे,” अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
यावेळी शरद पवारांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष आपणचं असून दुसरे कुणी काही दावा करु शकतात. पण ते सत्य नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी अजित पवारांना दिली. जे सांगायचे ते निवडणूक आयोगाला सांगू. तिकडे अनपेक्षित निर्णय लागल्यास दुसरा पर्याय आहे, असा इशाराही शरद पवारांनी दिला. भाजप सरकार विरोधकांवर दबाव आणण्यासाठी ईडी, सीबीआय आणि इतर संस्थांचा वापर करत आहे. काही महिन्यांनी निवडणूक होईल. त्यानंतर सरकार बदललं की या संस्था स्वायत्ता ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं शरद पवार म्हणाले. तसेच २०२४ मध्ये सत्तापालट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. वय ८२ असो किंवा ९२ त्याचा फार काही फरक पडत नाही. वेळ आल्यावर कुणाच्या पाठीमागे किती आमदार आहेत ते स्पष्ट होईल, अशी टीका शरद पवारांनी अजित पवारांवर केली.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदेंबाबतच्या बातम्या पसरविणाऱ्यांचे मनसुबे उधळू!
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फ्रान्स दौरा असेल एक दुर्मिळ सन्मान
मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी ‘त्या’ अपमानित कष्टकऱ्याचे पाय धुतले!
सुप्रिया सुळेंचे भाषण म्हणजे निबंध
अजित पवारांचा बैठकीवर आक्षेप
दरम्यान, अजित पवार यांनी दिल्लीतील शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस हरकत घेतली असून बैठक बेकायदा आहे, अशी भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. पक्षाबाबतचा निर्णय फक्त निवडणूक आयोग घेईल. त्यामुळे पवारांच्या राष्ट्रीय कार्यकारणी झालेल्या बैठकीचा निर्णय अवैध आणि बेकायदेशीर असल्याची भूमिका अजित पवार गटाची आहे. तसेच त्यांनी पक्षावर दावा सांगून अजित पवार यांची अध्यक्षपदी नियुक्ती देखील केली आहे.