राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार गेली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी गौरवोद्गार काढले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे लिखाण अजरामर आहे मराठी माणूस त्यावर शंका घेऊ शकत नाही असे पवार यांनी म्हटले आहे. पवारांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर सावरकरांच्या नावाला विरोध करणाऱ्या पवारांच्या अनेक समर्थक आणि मित्र पक्षांची पवारांनी गोची केल्याचे म्हटले जात आहे.
नाशिक येथे सुरू असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरुवातीपासूनच वादग्रस्त झालेले पाहायला मिळाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान असलेल्या नाशिक येथे होत असलेल्या या साहित्य संमेलनातील साहित्य नगरीला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देण्यात यावे या प्रस्तावाला विरोध करण्यात आला होता. तर साहित्य संमेलनाच्या सुरुवातीला सरस्वती पूजन न करण्याचा पराक्रम संमेलनाच्या आयोजकांनी करून दाखवला.
हे ही वाचा:
शिवमंदिर हटविल्यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी
‘साहित्य संमेलनात शाईफेक करणे हे चुकीचे आणि निषेधार्ह’
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांच्या तोंडाला काळे फासले
‘ओमिक्रोन सर्वांना मारून टाकेल’ म्हणत डॉक्टरने कुटुंबाला संपवले
रविवार, ५ डिसेंबर रोजी या साहित्य संमेलनाचा समारोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, न्यायमूर्ती चपळगावकर असे मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी भाषण करताना शरद पवार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत गौरवास्पद भाष्य केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावावरून वाद होऊच शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याची तुलनाच करता येणार नाही. स्वातंत्र्याची चळवळ तळागाळात घेऊन जाण्यासाठी सावरकरांनी जे लिखाण केले त्याची तुलना होऊ शकत नाही असे पवार म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे लिखाण अजरामर आहे आणि मराठी माणूस त्यावर शंका घेऊ शकत नाही असेही पवार यांनी म्हटले आहे.
तर दरवर्षी साहित्य संमेलनात वाद व्हायलाच हवा का असा सवालही पवारांनी केला आहे. पवारांच्या या भाषणाने सारेच अचंबित झाले असून आपल्या भाषणातून पवारांनी आपल्याच अनेक समर्थकांची दांडी गुल केल्याचे म्हटले जात आहे.