विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकीय पक्ष आणि काही अपक्ष उमेदवारांनी सुद्धा आज आपले उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. अर्थात अर्ज माघारी घेण्याची तारीख ही चार असल्यामुळे त्याचवेळी निवडणुकीचे मैदान स्पष्ट होणार आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दक्षिण महाराष्ट्रात खास करून सांगली जिल्ह्यामध्ये प्रचार सभा घेतल्या. त्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मतदारसंघात त्यांनी जी सभा घेतली त्या सभेमध्ये शरद पवार यांच्यावर निशाणा साधत त्यांनी लबाडा घरचे आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही असं सांगून टाकलं.
आपण बघतोय गेल्या दोन दिवसांपासून अजित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये वाकयुद्ध चालू आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये काँग्रेस असेल किंवा इंडि आघाडीतल्या घटक पक्षांना सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि एनडीए यांच्या विरोधामध्ये संविधान बदलणार हा एक नरेटीव्ह फिक्स करता आलेला होता. मात्र या विधानसभा निवडणुकीत अजूनही महाविकास आघाडीला सत्ताधारी महायुतीच्या विरोधामध्ये नरेटीव्ह फिक्स करता आलेला नाही. महाविकास आघाडी अजूनही चाचपडते आहे. त्यामुळे शरद पवार यांनी सुद्धा बारामतीमध्ये बोलताना अजित पवार यांच्यावरती टीका केली. अजित पवार यांच्यावर टीका करत असताना महायुती सरकारवर टीका करत महाराष्ट्रात उद्योग कसे आले नाहीत आणि महाराष्ट्रात येणारे उद्योग हे गुजरातला कसे गेले असा सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला. या त्यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून उत्तर दिलं.
शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी या वयामध्ये इतक खोटं बोलायचं नसतं, असं म्हणत त्यांनी काही पुरावे सुद्धा या ट्विटच्या माध्यमातून सादर केलेले आहेत. महाविकास आघाडीमधल्या नेत्यांच्या टिकेला तात्काळ उत्तर देण्यात आणि तेही पुराव्यासह यामध्ये महायुतीचे लोक सध्या आघाडीवर असल्याचा आपल्याला दिसून येईल.
तर मुद्दा हा आहे की, अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावरती इस्लामपूरमध्ये जाऊन टीका केली. इस्लामपूर हा जयंत पाटील यांचा बालेकिल्ला आहे. आणि जयंत पाटील यांच्या विरोधामध्ये निशिकांत पाटील यांच्या रूपाने अजित पवार यांनी उमेदवार दिलेला आहे. यापूर्वी नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निशिकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना धोबीपछाड दिलेला होता. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक तिथं चुरशीची होईल, अशी अटकळ बांधली जाते आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निशिकांत पाटील यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांनी सहभाग घेतली आणि काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी इस्लामपूर मध्ये जाऊन जयंत पाटील यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेचा दाखला देत त्यांनी पवार यांना लक्ष्य केलं. शरद पवार यांनी थेट जरी सांगितलं नसलं तरी जयंत पाटील यांच्याकडे भविष्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्रीपद येऊ शकतं असं एक सूचक विधान केलेले होतं. त्यामुळे जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये एक वेगळा उत्साह तयार झालेला होता.
हे ही वाचा:
ठाणे महानगरपालिका ऍथलेटिक्स प्रशिक्षण योजनेच्या खेळाडूंची विद्यापीठ स्पर्धात भरारी
बांगलादेशमध्ये छळ झालेल्या हिंदूंच्या न्यायाच्या आशा संपल्या
तिहार जेलचा वॉर्डनच चालवत होता ड्रगची प्रयोगशाळा, ९५ किलो ड्रग्ज छाप्यात जप्त!
राम मंदिर आणि उज्जैनच्या महाकाळ मंदिराला मिळाली धमकी
हाच धागा पकडत आज अजित पवार यांनी २००४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काँग्रेसपेक्षा दोन जागा जास्त असताना सुद्धा आणि नैसर्गिकरित्या मुख्यमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्क असताना सुद्धा शरद पवार यांनी चार इतर मंत्रीपद जास्त घेऊन मुख्यमंत्रीपद हे काँग्रेस पक्षाला दिलं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते हे चांगलेच बुचकळ्यात पडलेले होते. त्या घटनेची आठवण करून देत लबाडा घरच अवतान जेवल्याशिवाय खरं नाही. जे बोललं गेलं ते सगळं थापा आहेत असा थेट आरोप त्यांनी शरद पवार यांच्यावर केलेला आहे. आणि त्यांनी जे सांगितलं ती सुद्धा वस्तुस्थिती आहे. २००४ ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्त जागा येऊन सुद्धा त्यांनी मुख्यमंत्रीपद नाकारलं होतं अर्थात ते का नाकारलं याचं कोडं अजून उलघडलेलं नाही. त्याच्यामुळे पवार बोलतात ते करत नाहीत हेच अजितदादानी आज स्पष्ट केलं आहे.
जाताजाता त्यांनी जयंत पाटील यांच्यावर सुद्धा प्रहार केला आहे. करेक्ट कार्यक्रम करणं जनतेच्या हातात असतं. ती जनता बरोबर करते, असं सांगून त्यांनी जयंत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. एकूण काय तर प्रचाराचे फटाके फुटायला लागेलेत त्यातल्या त्यात बारामतीकरांच्या बॉम्बचे आवाज मोठे येऊ लागले आहेत. येणाऱ्या काळात हा ज्वर वाढणार आहे. थापांचे नवेनवे किस्से ऐकायला मिळणार आहेत.