उद्धव ठाकरे यांनी १६ डिसेंबरला गौतम अदानी यांच्याविरोधात धारावी ते बीकेसी असा मोर्चा काढला असला तरी त्यांच्यासोबत असलेले आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार मात्र अदानींचे कौतुक करत आहेत. बारामती येथे उभारल्या जात असलेल्या पहिल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरसाठी अदानींनी भरघोस मदत केली आहे. त्याबद्दल पवारांनी अदानींचे कौतुक करत त्यांचे आभार मानले आहेत.
विद्या प्रतिष्ठानच्या इंजीनिअरिंग कॉलेजच्या रोबोटिक लॅबचे उद्घाटन शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी अदानींचे कौतुक पवारांनी केले. पवार यावेळी भाषणात म्हणाले की, या आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरसाठी २५ कोटींच्या निधीची आवश्यकता होती आणि गौतम अदानी यांचे त्यासाठी नाव घ्यावे लागेल. त्यांनी या प्रकल्पासाठी २५ कोटींचा धनादेश पाठवला. फर्स्ट सिफोटेकनेही आपल्या या प्रकल्पासाठी १० कोटी रुपये दिले आहेत. या दोघांची मदत आपल्यासाठी उपयुक्त ठरली आहे, असे पवार म्हणाले.
सप्टेंबर महिन्यातही शरद पवार यांच्या भेटीसाठी अदानी बारामतीत आले होते. शिवाय, अहमदाबाद येथील अदानींच्या एका प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पवारांनी हजेरी लावली होती. यामुळे एकीकडे महाविकास आघाडीत प्रमुख पक्ष असलेले उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात मतभेद असल्याचे स्पष्ट झाले.
हे ही वाचा:
कृषीमंत्री धनंजय मुंडेंना कोरोनाची लागण!
भाषण देत असतानाच आयआयटी कानपूरचा प्राध्यापक कोसळला
राम लल्ला प्राणप्रतिष्ठेसाठी सीताराम येचुरी उपस्थित राहणार नाहीत
ठाण्यात आता तांबड्या पांढऱ्या रंगाचा ‘झेब्रा’
यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी शरद पवारांच्या प्रकल्पाला मदत दिली असेल तर त्याबद्दल आम्ही आक्षेप घेण्याचा कुठे प्रश्न येतो. अदानी यांना धारावीचा प्रकल्प सोपवताना काही अटी शर्तीचा विचार नीटपणे केला गेलेला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आंदोलन हाती घेतले.
शरद पवार यांचे अदानी यांच्याशी असलेले मधुर संबंध लपून राहिलेले नाहीत. त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकातही अदानी यांच्यावर पवारांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अदानी कशा संघर्षातून एक मोठे व्यावसायिक बनले याचा उल्लेख पवारांनी या पुस्तकात केला आहे.
मात्र सध्या राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस मात्र सातत्याने अदानीविरोधात भूमिका घेत आहे. पवारांच्या या प्रकल्पाला मदत केल्याबद्दल उद्धव ठाकरेंप्रमाणेच काँग्रेसनेही कठोर भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे एकीकडे अदानींविरोधात आंदोलने करायची, त्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य करायचे पण आपल्या महाविकास आघाडीतील सहकारी पक्षाकडून अदानींची मदत स्वीकारणे, त्यांचे कौतुक करणे याचा मात्र विरोध करायचा नाही, याबद्दल सर्वसामान्यांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.