मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांनी सहकारी पक्षांना विचारात घेतले नाही, त्यांनी सहकारी पक्षांना विचारात घ्यायला हवे होते असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. जून २०२२ला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. तेव्हा हा राजीनामा देणे ही चूक होती, अशी भूमिका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही व्यक्त केली होती. पण पवारांनी त्याबद्दल अद्याप कोणतीही भूमिका व्यक्त केली नव्हती. ती आता त्यांनी मांडली आहे.
शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील खदखद अधिक तीव्र झालेली आहे का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. अदानीप्रकरणी जेपीसीची आवश्यकता नाही, असे मत शरद पवारांनी व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडीत खळबळ उडाली होती.
उद्धव यांच्या राजीनाम्यासंदर्भात शरद पवार म्हणाले की, उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री दोन्ही पदे तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन संख्येच्या वरुन तयार झाली होती. यामध्ये तिन्ही पक्षाचा सहभाग होता. त्या संबंधित दुसरा निर्णय जर कोणी घेत असेल, राजीनामा देत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. पण अन्य सहकारी पक्षांसोबत संवाद ठेवण्याची आवश्यकता होती. चर्चा न करता निर्णय घेण्याचा दुष्परिणाम होतात. त्यावेळी चर्चा झाली नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येऊ शकत नाही असे पवार यांनी सांगितले.
हे ही वाचा:
सावरकर जयंती आता स्वातंत्र्यवीर गौरव दिन!
उद्धव ठाकरे बांधावर कधी जाणार? विरोधक घरी बसून असल्याबद्दल टीका
मुख्यमंत्र्यांना धमकी देणारा सापडला पुण्यात, पोलिसांनी घेतले ताब्यात
अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी; आता तारीखही दिली
दरम्यान अदानी प्रकरणात जेपीसीसंदर्भात शरद पवार यांचे सूर बदलल्याचे दिसत आहेत. सहकाऱ्यांना जेपीसी आवश्यक वाटत असेल तर विरोध करणार नाही, असे शरद पवार म्हणाले. मित्राचे मत माझ्यापेक्षा वेगळे आहे. परंतु, आम्हाला यात ऐक्य ठेवायचे आहे. माझे मत मी मांडले. पण सहकाऱ्यांना वाटत असेल की जेपीसी पाहिजे, तर मी त्याला विरोध करणार नाही. त्यांच्या मताशी सहमत नाही पण विरोधकांची एकीवर दुष्परिणाम होऊ देणार नाही. याबाबतीत आम्ही आग्रह धरणार नाही.
राज्यात फडतूस शब्दावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार सामना पाहायला मिळाला. परंतु फडतूस आणि काडतूस शब्दावरुन शरद पवार यांनी सर्वच नेत्यांना सूचना केल्या की, वैयक्तिक टीकाटिप्पणी करु नका, असे पवार म्हणाले. मला जो महाराष्ट्र माहित आहे, जी संस्कृती माहित आहे, जनतेची मानसिकता माहित आहे, अशा गोष्टी शक्यतो टाळा. वैयक्तिक हल्ला नको, राजकीय विषय घ्या, लोकांचे विषय घ्या, त्यावर आक्रमक व्हा, परंतु वैयक्तिक हल्ला, चिखलफेक ही स्थिती येता कामा नये. हे टाळण्याचे काम जाणीवपूर्व केले पाहिजे, असा सल्ला पवारांनी दिला.
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीसंदर्भात शरद पवार म्हणाले की, कोण कशी भूमिका घेईल, हे आज सांगता येणार नाहीत. पण हे जे तीन पक्ष आहेत, त्यांच्या सहकाऱ्यांची एकत्रित काम करण्याची मानसिकता आहे. जोपर्यंत ही मानसिकता आहे तोपर्यंत मला काळजी नाही. उद्या ही मानसिकता सोडून कोणी वेगळे जाण्याचा निर्णय घेतला तर तो त्यांचा निर्णय असेल. तिन्ही पक्षांचा नसेल असे पवारांनी सांगितले.