मोदी-पवार भेट! कशासाठी झाली तासभर चर्चा?

मोदी-पवार भेट! कशासाठी झाली तासभर चर्चा?

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. या भेटीची राजकीय वर्तुळात खूप चर्चा होत आहे. कालच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत घेतलेली अनेक मंत्र्यांची भेट आणि विशेष म्हणजे गृहमंत्री आणि नवे सहकार मंत्री अमित शाह यांची घेतलेली भेट यामुळे चर्चांना अजूनच उधाण आलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मामांचा कारखाना जप्त झाल्याची पार्श्वभूमीही या भेटीमागे आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी साडे दहाच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधान कार्यालयात जाऊन भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा झाली. या भेटीचा तपशील गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे. मात्र, नव्याने निर्माण करण्यात आलेलं सहकार खातं, महाराष्ट्रातील आणि देशातील सहकाराचे प्रश्न, सहकार खात्याकडून असलेल्या अपेक्षा आणि बँकिंग संदर्भातील विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.

कालच शरद पवार यांनी देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.  या भेटीत अजून एक माजी संरक्षण मंत्री ए के अँटोनी देखील उपस्थित होते.  देशाच्या या दोन्ही माजी संरक्षण मंत्र्यांनी या भेटीत देशातील सुरक्षा व्यवस्थेशी संबंधित मुद्दे तसेच सीमेवरील सुरक्षेसंदर्भातील मुद्यांवर चर्चा केली तसेच काही शंका देखील उपस्थित केल्या. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत लष्कर प्रमुख जनरल मुकुंद नरवणे आणि सीडीएस जनरल विपिन रावत यांनी शंकांचं निरसन केलं.

संसदेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्यामुळे मोदींसोबतच्या बैठकीत कृषी कायदे, शेतकरी आंदोलन आणि संरक्षणविषयक प्रश्नावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा:

ऑलिम्पिक स्पर्धेच्या ठिकाणी कोविडचा रुग्ण आढळला

‘या’ उच्च न्यायालयाचे आजपासून थेट प्रक्षेपण

हस्तक्षेप कराल तर पक्षाचं नुकसान होईल

लोणकरच्या कुटुंबियांनाच घ्यावी लागली मुख्यमंत्र्यांची भेट

काल केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पवारांची भेट घेतली. आज पवार थेट पंतप्रधानांच्याच भेटीला आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या भेटीत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत असलं तरी या भेटीला अनेक राजकीय कंगोरे असल्याचंही राजकीय निरीक्षक सांगत आहेत.

Exit mobile version