पवारांच्या नाराजीच्या पुड्या…

पवारांच्या नाराजीच्या पुड्या…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नाराज असल्याच्या पुड्या हल्ली काही वारंवार सुटत असतात. यात तथ्य किती हे केवळ ‘जाणत्या’ पवारांनाच ठाऊक. मनसुख हिरेन प्रकरणातील वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यावरून पुन्हा नाराजीच्या वृत्तांचे पेव  फुटले आहे. सूत्रांनी दिलेल्या बातम्या खऱ्या असल्या तर पवारांची परीस्थिती घरात किंमत नसलेल्या नाराज सासू सारखी झालेली आहे, असे मानायला हरकत नाही.

‘वाझे प्रकरणावरून शरद पवार नाराज आहेत, ते फोनवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी बोलले, ते त्यांना भेटायला येणार आहेत’, असे सूत्रांच्या हवाल्याने चॅनलवाले सांगतायत. 

या बातम्यांमध्ये तथ्य किती? पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर सुद्धा अशीच चर्चा होती. पण झाले काहीच नाही. 

रेणू शर्माच्या प्रकरणात अशाच पुड्या सोडण्यात आल्या होत्या. पण धनंजय मुंडे प्रकरणातून सहीसलामत बाहेर आले.

पूजा चव्हाण आत्महत्येनंतर ठोस पुरावे असताना पोलिसांनी साधा एफआयआर घेतलेला नाही. गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे, हे जनतेला ठाऊक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला दुखावण्याची इच्छा नसेल कदाचित, पण त्यांनी स्वत:च्या पक्षाच्या गृहमंत्र्यांचे कान उपटल्याचे ऐकिवात नाही.

संजय राठोड शिवसेनेचा सदस्य म्हणून सरकारची प्रतिमा मलिन होत असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून गृहमंत्री झालेल्या अनिल देशमुखांमुळे सरकारची प्रतिमा उजळली असे म्हणण्यासारखी परीस्थिती आहे काय? पूजा चव्हाण प्रकरणात पोलिसांच्या ढीम्म भूमिकेचे श्रेय मुख्यमंत्र्यांबरोबरच अनिल देशमुखांनाही जाते.

आता म्हणे, वाझे प्रकरणात पवार पुन्हा नाराज आहेत, पण कदाचित सूत्रांना मिळालेली नाराजीची खबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांपर्यंत पोहोचली नसावी. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी याप्रकरणी विधानसभेत नाराजी व्यक्त केल्याचे किंवा याप्रकरणात काही ठोस भूमिका घेतल्याचे ऐकिवात नाही. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनीही नेमका हाच मुद्दा उपस्थित केला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाझे प्रकरणावरून नाराजी असती तर त्यांनी ती व्यक्त केली असती असे, ते म्हणाले. 

केवळ मूक राहून शिवसेनेची मजा बघायची आणि पवार नाराज असल्याच्या बातम्या पसरवून लोकांची सहानुभूती घ्यायची अशी राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती आहे काय? 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य वाझे प्रकरणात बोलत नसले तरी अनिल देशमुख मात्र गृहमंत्री म्हणून शिवसेनेची जोरदार पाठराखण करीत आहेत. 

वाझे प्रकरणी ठाकरे सरकारची प्रतिमा मलिन होत असली तर त्याचे श्रेय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत अनिल देशमुख यांनाही जाते.

ठाकरे सरकारला आता सव्वा वर्षाचा काळ होत आला. संपूर्ण कोरोना काळात मुख्यमंत्री जनतेला दिलासा न देता घरी बसले होते. अवकाळी पाऊस असो, वादळ असो जनतेला मुख्यमंत्र्यांचे अस्तित्व जाणवले नाही. अधेमध्ये फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेला दर्शन देत होते, नऊ महिने मंत्रालयाची पायरी चढले नाहीत, तरीही पवार चिडले नाही. 

अनेक प्रकल्पांना स्थगिती देण्यात आली, यू-टर्न झाले, पण पवारांना राग आला नाही. भंडा-यात दहा बालके जळून मेली, यवतमाळमध्ये बालकांना पोलियो डोस ऐवजी सॅनिटायझर पाजले, एका महिन्यात राज्यात ९९७ बालमृत्यू झाले, तेव्हाही पवार बोलले नाही, मग आता असे काय आकाश कोसळले आहे की पवार नाराज होतील?

सगळ्यांचे उत्तम गुळपीठ आहे. कुणी नाराज नाही आणि कुणी महाराज नाही. सत्तेसाठी सगळे एकमेकांना घट्ट धरून आहेत. तिन्ही पक्षांचे उत्तम चालले आहे. त्यात प्रतिमा कुरवाळणारा एकही नेता नाही. त्यांना सरकारच्या प्रतिमेशी काहीही घेणेदेणे नाही. 

हे सरकार जेवढा काळ चालेल तेवढा काळ चालवायचे, जेवढी जमवाजमव करता येईल तेवढी करायची एवढाच या सरकारचा एक कलमी कार्यक्रम. 

पुन्हा जनतेला सामोरे जावे लागले तर हाती काय येईल याची तिन्ही पक्षांना कल्पना आहे. त्यामुळे उगाच चिडचिड करून एकमेकांची नाराजी कोण ओढवून घेईल? नाराजीच्या बातम्या पेरल्यानंतर नेते मंडळींना सहानभूतीच्या नजरेने पाहण्या इतकी आता जनता खुळी राहीली नाही.

Exit mobile version