पवार आमचे नेते नाहीत, राष्ट्रवादीचा जन्मच खंजीर खुपसून झालाय! का म्हणाला, शिवसेना नेता

पवार आमचे नेते नाहीत, राष्ट्रवादीचा जन्मच खंजीर खुपसून झालाय! का म्हणाला, शिवसेना नेता

राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत आलबेल नाही हे वारंवार दिसत असते. आता शिवसेनेच्या नेत्यानेच या तीन पक्षातील विसंवादावर खळबळजनक भाष्य केले आहे.

श्रीवर्धन तालुक्यात सरपंच आणि उपसरपंच पक्ष प्रवेश सोहळ्यानिमित्त माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी जाहीर बोलताना, त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत खरपूस टीका केली.

ते म्हणाले की, राज्यात तीन पक्ष एकत्र आहेत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस. पण दोन्ही काँग्रेस एकमेकांचे तोंडही बघत नाहीत. त्यांच्या विचारांची सांगड बसते का? जर दोन काँग्रेस एका विचाराचे होऊ शकत नाहीत तर शिवसेना काँग्रेसी विचारांची कदापिही होऊ शकत नाही. गिते पुढे म्हणाले की, मुळात राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेला आहे. मग या दोन काँग्रेस एक होऊ शकत नाहीत तर आम्ही त्यांच्या विचारांचे कसे होणार? कोणीही कुठलाही नेता जगाने त्याला कितीही उपाध्या देवो, जाणता राजा बोलो. तो आमचा गुरु होऊ शकत नाही. आमचा गुरु फक्त बाळासाहेब ठाकरेच.

फक्त मुख्यमंत्री आपले, काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नाहीत

गिते यांनी भाषणात सांगितले की, आज शिवसेना काय हेच मी सांगणार आहे. राज्यात सरकार आहे आपलं. पण आपलं का म्हणायचं तर आपले मुख्यमंत्री आहेत म्हणून. पण बाकी काँग्रेस-राष्ट्रवादी आपले नव्हेत. आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचं सरकार नाही. सरकार आघाडी सांभाळेल. सरकार आघाडीचे नेते सांभाळतील. आपली जबाबदारी शिवसेना सांभाळण्याची आहे. आपले गाव सांभाळत असताना आघाडीचा विचार नाही करायचा, आपल्याला शिवसेनेचा विचार करायचा आहे.

अनंत गीते हे २०१४ मध्ये मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये केंद्रीय अवजड उद्योगमंत्री होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत तत्कालिन शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री असलेले अनंत गीते पराभूत झाले होते. रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत गीते निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांचा पराभव केला.

Exit mobile version