२ मे च्या विधानसभा निकालांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदाचे वेध लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यासंबंधीचे संकेत देण्यात आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधून मोर्चा स्थापन करायला प्रयत्न करतील, ज्यात प्रामुख्याने प्रादेशिक पक्षांचा समावेश असेल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात येत आहे.
२ मे रोजी देशातील पाच विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले. या महत्वाच्या पाच विधानसभा निवडणुकांमध्ये आसामचा अपवाद वगळता बाकी चारही राज्यात नागरिकांनी प्रादेशिक पक्षाला कौल दिल्याचे पाहायला मिळाले. अर्थात या चारही राज्यात भारतीय जनता पार्टीच्या आकडेवारीत सुधारणा झालेली दिसली, तर काँग्रेसची मात्र पिछेहाट अजूनही सूरु असल्याचे दिसून आले. यापैकी पश्चिम बंगालच्या निवडणुकांकडे साऱ्या देशाचे लक्ष लागले होते. ममता बॅनर्जी यांचे सरकार उलथून लावण्यासाठी भाजपाने चंग बांधला होता. पण त्यात त्यांना अपयश आले. ममता बॅनर्जी यांनी आपल्या विजयानंतर पत्रकारांशी बोलताना विरोधकांची एकटा गरजेची आहे असे मत मांडले.
हे ही वाचा:
ठाकरे सरकार इम्तियाज जलील यांची मागणी मान्य करणार का?
बंगाल हिंसाचार: संजय राऊतांनी केली ममता बॅनर्जींची पाठराखण
बंगाल हिंसाचार: पंतप्रधान मोदींची राज्यपालांशी चर्चा
बॅनर्जी यांच्या याच विधानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी पश्चिम बंगाल निवडणुकीच्या आधी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणायचे प्रयत्न केले होते. आता देखील येणाऱ्या काळात ते विरोधी पक्षांना आणि त्यातही प्रादेशीक पक्षांना एकत्र करण्यासाठी प्रयत्न करतील असे मलिक यांनी सांगितले आहे. त्यामुळे अनेक वर्ष ‘प्राईम मिनिस्टर इन वेटिंग’ असं म्हटले गेलेले पवार हे पुन्हा एकदा पंतप्रधान होण्यासाठी प्रयत्न करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.