राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण केली आहे. देशमुखांवर टाकण्यात आलेल्या धाडीतून काहीही सापडणार नाही आणि आम्हाला त्याची चिंता नाही असे शरद पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शुक्रवारी सकाळी साडे सात वाजल्यापासून सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने छापेमारी केली आहे. देशमुख यांच्या मुंबई तसेच नागपूर येथील निवासस्थानी ही छापेमारी सुरू असून त्यांच्या स्वीय सहाय्यक का नाही ताब्यात घेतले आहे.
शुक्रवारी अनिल देशमुख ह्यांच्या विरोधात सक्तवसुली संचालनालयामार्फत चावले गेलेले धाडसत्र हे साऱ्या राज्यात चर्चेचा विषय ठरले. देशमुख ह्यांच्या विरोधात होत असलेली ही कारवाई आकसातून होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. तर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच ही कारवाई होत असून यात कोणत्याही प्रकारचा राजकीय अन्वयार्थ शोधण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
या सर्व प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना अनिल देशमुख यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. अनिल देशमुख यांची चौकशी ही नैराश्यातून आणि त्रास देण्यासाठी होत असल्याचे पवार यांनी सांगितले. तर देशमुखांवर टाकण्यात आलेल्या धाडीतून काहीही सापडणार नाही. या गोष्टी आमच्यासाठी नव्या नाहीत. त्यामुळे आम्हाला त्याची चिंता नसल्याचे पवार म्हणाले. तर ईडी, सीबीआय सारख्या केंद्रीय यंत्रणा वापरून सूड उगवण्याचा नवा पॅटर्न तयार झाल्याचा आरोप शरद पवार यांनी केला आहे.