राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी युक्रेनमधील विद्यार्थ्यांची झालेली कोंडी आणि त्या परिस्थितीचा पुण्याशी संबंध जोडला. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुण्यातील मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. त्यांनी सांगितले की, पुण्यात मेट्रो रेल्वेचे उद्घाटन होत आहे, पण त्यापेक्षाही महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे या युक्रेनमध्ये अडकलेल्या मुलांची सुटका हे आहे.
शरद पवारांनी युक्रेन आणि पुणे असे नाते जोडून त्यातून केंद्र सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, वैद्यकीय शिक्षणासाठी रशिया, युक्रेन, चीन या देशांत भारतीय विद्यार्थी जातात. ८० ते ९० गुण मिळविणाऱ्यांना तिथे प्रवेश मिळतो. हजारो विद्यार्थी त्या देशात शिकायला जातात. युक्रेन हा वेगळा देश आहे. तो सुंदर देश आहे. मी दोन तीन वेळा गेलो होतो. पुणे हे शिक्षणाचे माहेर घर आहे. तसे युक्रेन हे शिक्षणाचे माहेरघर आहे. रशिया आणि युक्रेनचा संघर्ष जो सुरू आहे. परराष्ट्रमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. केंद्र जे करता येईल ते करत आहे. पण तरीही अजून विद्यार्थी अडकले आहेत. लवकरात लवकर त्यांना युक्रेनच्या सीमेच्या बाहेर येता येईल असा निर्णय घ्या.
हे ही वाचा:
‘शेतकऱ्याचा जन्म नको म्हणायची वेळ ठाकरे सरकारने आणलीये’
रशिया काही तास बॉम्बवर्षाव करणार नाही…हे आहे कारण!
युद्ध थांबवण्यासाठी रशियाने युक्रेनसमोर ठेवल्या या अटी
शरद पवार पुढे म्हणाले की, मुलांचे म्हणणे असे की ६-७ तास चालायला लागेल असे युक्रेनची सीमा येते पण थंडी आहे, हल्ले होत आहेत. गोळीबार सुरू आहे. त्यामुळे अजूनही विद्यार्थी अडकले आहेत. आज हे संकट आहे, त्यात काय केले काय केले नाही याचा विचार करण्याची वेळ नाही त्यांना वाचवायला हवे. पुण्यात काही महत्त्वाचे प्रकल्प येतात. त्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला आहे. पण मुलांची सुटका करण्याकडे लक्ष द्या.