महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला आणि महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण आले. पटोले यांनी राजीनामा दिल्यानंतर पुढील विधानसभा अध्यक्ष कोण या विषयीच्या कुजबुजींना उधाण आलेले असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सवयीप्रमाणे या विषयात एक काडी टाकलेली आहे. ‘पुढील विधानसभा अध्यक्ष कोण होणार यासाठी चर्चा केली जाईल’ असे विधान शरद पवारांनी केले आणि चर्चेची दिशाच बदलली.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे होते पण पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे ते आता खुले झाले आहे. त्यामुळे आता नवा अध्यक्ष कोण होणार यावर चर्चा होईल असे शरद पवारांनी म्हटले आहे. पवारांच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत पुन्हा एका नव्या विषयावरून कुरबुर सुरु होणार का? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्षपद आता काँग्रेस पक्षाकडेच राहणार की राष्ट्रवादी त्यावर दावा सांगणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदाच्या बदल्यात काँग्रेस पक्ष राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदावर दावा सांगू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.
नाना पटोले यांनी गुरुवारी संध्याकाळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. नाना पटोले यांच्यावर महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे.