राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांनी एक नवी पुडी सोडली आहे. भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करावे अशी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा होती असे शरद पवार यांनी म्हटले आहे. दैनिक लोकसत्ता आयोजित एका कार्यक्रमात पवार यांनी हे विधान केले आहे. पण पवारांच्या आजवरचा इतिहास बघता हे विधान म्हणजे पवारांची नवी पुडी असल्याचे म्हटले जात आहे.
दैनिक लोकसत्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जीवनावर आधारित ‘अष्टावधानी’ या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन केले. बुधवार, २९ डिसेंबर रोजी हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी शरद पवारांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत शरद पवारांनी भाजपाशी युती करण्यासंदर्भातील विधान केले.
हे ही वाचा:
बांद्रा रेक्लेमेशनला कोरोना रुग्ण ‘वाढविण्याची’ सोय?
निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधी पुन्हा परदेशात पळाले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकाच्या मुलावर बलात्काराचा गुन्हा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत युती करून महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याची खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा होती असे शरद पवार यांनी म्हटले आहे भाजपा या युतीसाठी आग्रही होता असे देखील पवार म्हणाले आहेत. खुद्द नरेंद्र मोदी यांनी या युतीबाबत चर्चा केली होती असे पवार यांनी सांगितले. आपण या संदर्भात विचार करायला हवा असे मोदी म्हणाले असल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार यांनी या युती संदर्भात नकार दिल्याचेही त्यांनी सांगितले. तर ही युती संभव नसल्याचे पवारांनी मोदींना सांगितल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही बातचीत खुद्द पंतप्रधानांच्या कार्यालयात झाली असल्याचाही दावा पवारांनी केला आहे.
दरम्यान आपल्या एका वक्तव्याने शिवसेना आणि भाजपा हे पक्ष दुरावले असल्याचे पवारांनी म्हटले आहे. “देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला जर काही मतांची गरज लागली तर आम्ही त्याचा गांभीर्याने विचार करू” या आपल्या एका वक्तव्याचा सेना-भाजपा मधील अंतर वाढायला उपयोग झाला असे शरद पवार यांनी सांगितले आहे.