आयकर विभागाची कारवाई पवारांना बोचली! भाजपावर आगपाखड

आयकर विभागाची कारवाई पवारांना बोचली! भाजपावर आगपाखड

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सकट पवार कुटुंबातील काही सदस्यांवर आयकर विभागाचे पडलेले छापे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलेच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये बोलत असताना पवार या एकूणच कारवाईविरोधात आक्रमक झालेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

लखीमपुर खेरी हिंसाचार प्रकरणात आपण केलेल्या विधानामुळे अजित पवारांवर आयकर विभागाचे छापे पडले असे पवार यांनी म्हटले आहे. तर आयकर विभागाची कारवाई म्हणजे सत्तेचा गैरवापर असल्याची जुनीच बांग पवारांनी पुन्हा एकदा दिली आहे. उत्तर प्रदेशातील घटनेला जालियन वाला बाग हत्याकांडची उपमा आपण दिल्यामुळेच ही कारवाई सुरू असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

६८ वर्षांनी एअर इंडिया टाटांकडे

चीनची पुन्हा आगळीक; तवांग क्षेत्रात केली घुसखोरी

महाराष्ट्रात १०५० कोटींचा भ्रष्टाचार

जे जे इन्स्टिट्यूटमधून गायब झाले कॅमेरे, महागड्या लेन्स

या संपूर्ण भाषणात शरद पवार यांनी भाजपावर चांगलीच आगपाखड केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी ईडीची नोटीस पाठवणाऱ्या भाजपाला महाराष्ट्राने येडी ठरवले असे पवार यांनी म्हटले आहे. पण वास्तवात शरद पवार हे स्वतः कोणत्या ही नोटीस विना ईडी कार्यालयात गेले होते आणि विधानसभा निवडणुकीत भाजपाही सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला होता.

तर आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत भाजपला खड्यासारखे बाजूला करूया असा निर्धार पवार यांनी बोलून दाखवला आहे. तर महाविकास आघाडी मजबूत असल्याचा दावा होत असतानाच पवार पुन्हा एकदा सरकार टिकवायची भाषा करताना दिसले. ‘हे सरकार टिकवायचे आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्र्यांचा सन्मान वाढवायचा आहे. हे राज्य चुकीच्या हातात जाऊ द्यायचे नाही’ असे पवार म्हणाले. नुकत्याच पार पडलेल्या सहा जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निकालांतून भाजपा पुन्हा एकदा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळेच पवारांनी धसका घेऊन हे विधान केले असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

Exit mobile version