राष्ट्रवादीचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांनी भाजपाच्या निकटवर्तीय बड्या उद्योगपतीची भेट घेतल्याची माहिती आहे. अहमदाबादच्या फार्महाऊसवर ही भेट झाली. महाराष्ट्राच्या राजकारणावर या भेटीचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अहमदाबादमधील फार्महाऊसवर २६ मार्चच्या रात्री ९:३० वाजता ही भेट झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पटेलांची संबंधित उद्योजकाशी भेट झाली, त्यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही अहमदाबादमध्येच होते. मात्र या बैठकीला पवार उपस्थित होते का, याची पुष्टी मिळालेली नाही.
दुसरीकडे, शरद पवार आणि प्रफुल पटेल यांची केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यासोबत गुप्त चर्चा झाल्याची माहिती ‘दिव्य भास्कर’ या गुजराती वृत्तपत्राने दिली आहे. शांतिग्राममधील गेस्टहाऊसला पटेल आणि पवार प्रायव्हेट जेटने आले होते, असा दावा या बातमीत करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
जगातील सर्वात मोठा लसीकरण कार्यक्रम, भारतासाठी अभिमानाची बाब
सरकारकडे ‘डॅमेज कंट्रोल’ची कोणतीही यंत्रणा नाही- संजय राऊत
चिल्लर औरंगजेबी मानसिकतेचा धिक्कार
सचिन वाझे, परमबीर सिंह प्रकरणांमध्ये अडकलेले महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाकडून वारंवार केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर या भेटीच्या बातमीने राजकीय वर्तुळांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. २०१९ मध्ये निवडणुकांनंतर भाजपा आणि राष्ट्रवादीच्या औटघटकेच्या सरकारचा प्रयोगही सगळ्यांच्या लक्षात आहे.