कथित शाह-पवार भेटीने महाविकास आघाडीत खळबळ

कथित शाह-पवार भेटीने महाविकास आघाडीत खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी अहमदाबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. या भेटीच्या वृत्तानंतर राज्यात आणि देशातील राजकारणात अनेक हालचाली सुरु झाल्या आहेत. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं म्हटलं आहे, तर काँग्रेस नेत्यांनी या भेटीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

जर देशाचे गृहमंत्री एखाद्या मोठ्या नेत्यासोबत बैठक घेत असतील तर त्याची माहिती त्यांनी नागरिकांना देणे आवश्यक आहे. याबद्दल जाणून घेणे नागरिकांचा हक्क आहे. काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, “गृहमंत्री एखाद्या मोठ्या नेत्याला भेटत असतील तर देशाला याची माहिती असायला हवी. दोन्ही नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे देशाला कळायला हवं.”

हे ही वाचा:

ठाकरे सरकारच्या हिंदू विरोधी फतव्याला केराची टोपली दाखवत राज्यात होळीचा उत्साह

मिठी नदीतून सापडले सचिन वाझेच्या पापाचे पुरावे

कम्युनिस्ट नेत्याच्या हत्येसाठी तृणमूल नेत्याला अटक

वाझेचा साथीदार धनंजय गावडेची अटक आता अटळ

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी गुप्त बैठकीच्या बातमीबद्दल म्हटलं की, “गुजरातमधील एका वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे की शरद पवार साहेब आणि प्रफुल्ल पटेल यांनी अमित शाह यांची भेट घेतली. गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवर अशा अफवा उडवल्या जात आहेत. अशी कोणतीही बैठक अद्याप झालेली नाही.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची पुन्हा एकदा पाठराखण करत, “शरद पवार हे जर काही कामानिमित्त गृहमंत्र्यांना भेटले असतील तर त्यात चुकीचं काय आहे?” असं म्हणाले. शरद पवार आणि अमित शाह भेटीचे अनेक राजकीय अर्थ हे सचिन वाझे आणि परमबीर सिंग पार्श्वभूमीवर लावले जात आहेत. परंतु संजय राऊत यांना ही भेट राजकीय न वाटता ‘कामाची’ वाटत आहे.

Exit mobile version