‘आसाममध्ये गंभीर प्रश्न, मुस्लिम लोकसंख्या १२ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर’

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी व्यक्त केली चिंता

‘आसाममध्ये गंभीर प्रश्न, मुस्लिम लोकसंख्या १२ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर’

आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आसामच्या लोकसंख्येतील बदलाबाबत महत्त्वाचे विधान केले. मुख्यमंत्री हिमंता म्हणाले की, आसामच्या लोकसंख्येतील बदल हा एक मोठा प्रश्न आहे. आसाममधील मुस्लिम लोकसंख्या आज ४० टक्क्यांवर पोहोचली आहे, १९५१ मध्ये ही लोकसंख्या १२ टक्के होती.

हिमंता बिस्वा सरमा हे झारखंडच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी दावा केला आहे की, झारखंडमध्ये काही महिन्यांनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप विजयाची नोंद करेल आणि राज्यात डबल इंजिन सरकार स्थापन होईल. यावेळी ते म्हणाले की, “आसाममधील मुस्लीम लोकसंख्या आज ४० टक्क्यांवर पोहोचली आहे, १९५१ मध्ये ही लोकसंख्या १२ टक्के होती. आपण अनेक जिल्हे गमावले आहेत. हा माझ्यासाठी राजकीय मुद्दा नाही तर, जीवन-मरणाचा प्रश्न आहे,” अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.

हिमंता बिस्वा सरमा हे झारखंड भाजपचे सहप्रभारी आहेत. गेल्या महिनाभरात ते तिसऱ्यांदा झारखंडमध्ये आले आहेत. ते म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आमच्या पक्षाने राज्यात चांगली कामगिरी केली आहे. विधानसभा निवडणुकीत आम्ही आणखी चांगले निकाल मिळवू. राज्यातील जनतेवर आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आणि समर्थकांवर आमचा विश्वास आहे.

हे ही वाचा:

दहशतवादी यासिन भटकळ विशाळगडावर कधीपासून आणि कोणाकडे राहायला होता याची चौकशी होणार

मुंबई विमानतळावर ९ कोटी किमतीचे सोने जप्त, ७ जणांना अटक !

अपंगत्व प्रमाणपत्रासाठी पूजा खेडकरचे बनावट रेशन कार्ड?

महायुती सरकारची नवी योजना; विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा १० हजार

तसेच हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले की, झारखंडमध्ये आल्यानंतर त्यांना उर्जा मिळते. गेल्या ५ जुलैपासून पक्षातर्फे राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघात बूथ स्तरावरील नेते आणि कार्यकर्त्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाबुलाल मरांडी, विरोधी पक्षनेते अमरकुमार बौरी, केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी, माजी केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा आणि पक्षाचे खासदार, आमदार या कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असून बूथ स्तरावर कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीच्या टिप्स देत आहेत.

Exit mobile version