सर्वसामान्यांचे नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

सर्वसामान्यांचे नेते गणपतराव देशमुख यांचे निधन

सर्वसामान्यांशी आयुष्यभर जोडलेली नाळ, सरळ साधे आयुष्य, महाराष्ट्रातील प्रत्येक प्रश्नाची उत्तम जाण, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे आणि आपल्या या सत्शील राजकारणामुळे तब्बल ११ वेळा आमदार म्हणून सांगोल्यातून निवडून आलेले महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तिमत्व  गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी निधन झाले. ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते. शुक्रवार, ३० जुलै रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसापासून गणपतराव देशमुख यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरु होते. पण अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

गणपतराव देशमुख यांच्याप्रती महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत आदराचे स्थान होते. संपूर्ण राज्यभर ते आबा या म्हणूनच प्रसिद्ध होते. गणपतरावांनी महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणूक सोलापुरातील सांगोला मतदार संघातून लढवली होती आणि जिंकली होती. तेव्हापासून अगदी अत्ताच्या २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत गणपतराव राजकारणात सक्रिय होते. ५० वर्षांपेक्षा अधिक काळ ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य राहिले. या कालावधीत तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा बहुमान त्यांनी मिळवला. या आपल्या राजकीय कारकिर्दीत दोन वेळा महाराष्ट्राचे मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

हे ही वाचा:

पॅकेजच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी वाजवली जुनीच टेप! म्हणाले…

ठाकरे सरकार म्हणजे दर चार दिवसांनी नवी पुडी सोडून वेळ मारून न्यायची

अनिल देशमुख यांची अटक निश्चित

वीजबिल माफीवर सवाल केला आणि साहेबांचा मूड गेला

गणपतरावांनी २०१९ ची विधानसभा निवडणुकही लढवावी असा आग्रह केला जात होता. पण वयाच्या कारणास्तव त्यांनी निवडणूक लढवायला नकार दिला. विशेष म्हणजे गणपतरावांनी आजवर एकदाही शेकाप व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या पक्षातून निवडणूक लढवली नाही. ते अखेरपर्यंत पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते राहिले.

Exit mobile version