राम मंदिर निर्माण चळवळीतील बिनीचे शिलेदार आणि राम मंदिर निर्माणासाठी आपले मुख्यमंत्री पद पणाला लावणारे जेष्ठ भाजपा नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने देशभरातील तमाम हिंदुत्ववादी कार्यकर्ते हळहळले आहेत. तर अनेक जेष्ठ नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
गेल्या काही काळापासून कल्याण सिंह यांची प्रकृती चिंताजनक होती. लखनऊ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या ठिकाणी त्यांच्यावर ४ जुलैपासून उपचार सुरू होते. डॉक्टर त्यांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत होते. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. अखेर आज शनिवार, २१ ऑगस्ट रोजी रात्री त्यांचे निधन झाल्याचे जाहीर करण्यात आले.
सुरुवातीला कल्याण सिंह यांच्यावर राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस येथे उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांची प्रकृती अधिक चिंताजनक झाल्यावर ४ जुलै रोजी त्यांना संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या अतिदक्षता विभागात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
गेल्या काही दिवसांपासून कल्याण सिंह यांची प्रकृती चिंताजनक असून ते लाइफ सपोर्ट सिस्टिम वर होते. काही दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्यांना भेटून गेले होते. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील त्यांची चौकशी केली होती.
हे ही वाचा:
अफगाणिस्तानातील भारतीय सुखरूप! कोणाचेही अपहरण नाही
सीताराम कुंटे यांनीच टॅपिंगला मंजुरी दिली होती, मग…
मनसुख हिरेन नंतर कळवा खाडीत सापडला आणखीन एका उद्योजकाचा मृतदेह
अनिल देशमुखांना वॉरंट बजावणार का?
कल्याण सिंह यांची राजकीय कारकीर्द
१९६७ साली कल्याण सिंह हे पहिल्यांदा उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले. भारतीय जनसंघाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत उत्तर प्रदेश विधानसभेत प्रवेश केला. त्याच्यानंतर सलग १९६९, १९७४, १९८०, १९८५, १९८९, १९९१, १९९३, १९९६ आणि २००२ अशा ९ वेळा ते आमदार म्हणून निवडून गेले.
१९९१ साली जून महिन्यात कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. ६ डिसेंबर १९९२ साली जेव्हा बाबरी ढाचा पडला तेव्हा कल्याण सिंह मुख्यमंत्री म्हणून कार्यरत होते. त्यावेळी ढाचा पडल्याच्या काही तासांतच त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. पुढे १९९७ साली ते पुन्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून पदावर आले.
पण कालांतराने सिंह यांनी भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रीय क्रांती पार्टीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी जन क्रांती पार्टी नावाचा स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला. २०१४ साली त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत स्वगृही परतले. त्यानंतर त्यांना राजस्थानचे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त भार देण्यात आला होता.