लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दिल्लीमध्ये आज (५ जून) राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (एनडीए) बैठक पार पडली.या बैठकीत एनडीएचे घटक पक्ष जेडीयू, एलजेपी, टीडीपी, जेडीएस आणि शिवसेना उपस्थित होते. बैठकीत सरकार स्थापनेबाबत चर्चा झाली. या बैठकीत एनडीएचा नेता म्हणून नरेंद्र मोदींची निवड करण्यात आली आहे.एनडीए बैठकीतील प्रस्तावावर २१ नेत्यांनी सह्या केल्या आहेत.महाराष्ट्रामधून मुख्यमंत्री शिंदे, प्रफुल पटेल आणि सुनील तटकरेंच्या सह्या आहेत.त्यामुळे पंतप्रधान पदाचा मार्ग आता मोकळा झाला असून बैठकीमध्ये नरेंद्र मोदींची निवड करण्यात आली आहे.
नरेंद्र मोदींची देखील या प्रस्तावावर सही आहे.नरेंद्र मोदींसह एनडीएचे इतर नेते आज संध्याकाळपर्यंत राष्ट्रपतींकडे हा प्रस्ताव घेऊन जाणार आहेत आणि सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत.आज पासून ९ जून पर्यंत राष्ट्रपती भवन हे सर्वसामान्यांसाठी बंद राहणार आहे.त्यानुसार मोदींचा ८ किंवा ९ जूनला शपथविधी सोहळा पार पडू शकतो.आज राष्ट्रपतींनी १७ वी लोकसभा विसर्जित केली आहे.त्यामुळे सरकार स्थापनेचा मार्ग आता मोकळा झालेला आहे.
हे ही वाचा:
मला मोकळं करा… राज्याच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची फडणवीसांची इच्छा!
नरेंद्र मोदींचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला; काळजीवाहू पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळणार
नितीशकुमार उलटले तरी भाजप स्थापन करू शकते एनडीए सरकार!
भाजपाच्या नेतृत्वात एनडीएच्या विजयानंतर नरेंद्र मोदींवर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव
दरम्यान, बैठक संपल्यानंतर जनता दल युनायटेडचे (जेडीयू) खासदार संजय कुमार झा म्हणाले की, नितीश कुमार एनडीएच्या बैठकीला उपस्थित होते. बैठकीत सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि एनडीएला तिसऱ्यांदा जनादेश दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले. ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होणार असून लवकरच सर्व खासदारांची बैठक होणार आहे.
एनडीएच्या बैठकीपूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिला. दिल्लीतील एनडीएच्या बैठकीत दोन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. महाराष्ट्रात शिवसेनेने सात तर राष्ट्रवादीने एक जागा जिंकली आहे.टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू एनडीएच्या बैठकीला उपस्थित होते.दरम्यान, सर्वांच्या एकमताने एनडीएचा नेता म्हणून मोदींची निवड करण्यात आली असून मोदी आता तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.