शिवसेना नेते आणि महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब हे सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने अनिल परब यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. परब हे सध्या रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय विश्रामगृहात मुक्कामी असून या विश्राम गृहाला पोलिसांचा वेढा दिसत आहे. परब यांच्या सुरक्षेचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला असून तब्बल पन्नास पोलिसांचे सुरक्षा कवच अनिल परब यांना पुरवण्यात आले आहे.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या काही काळापासून परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात राज्यभरातून असंतोष दिसून येत आहे. आजही अनेक ठिकाणी एसटी कर्मचारी हे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करताना दिसत आहेत. तर या सर्व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या तयारीत राज्य सरकार आहे. या सर्व आंदोलनकारी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्याचा सरकारचा पवित्रा दिसत आहे. त्यामुळे परब यांच्या विरोधातील असंतोषात वाढ होताना दिसत आहे.
हे ही वाचा:
सोशल मीडियाच्या व्यसनापायी १६ वर्षीय मुलाने गमावला जीव
ठाकरे सरकारला दणका; देशमुख प्रकरणात सीबीआय करणार चौकशी
सुनील गावस्करांनी राजदीप सरदेसाईला दाखविली त्याची जागा
UNESCO च्या संस्कृतिक वारसा यादीत दुर्गा पूजेचा समावेश
या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांपासून अनिल परब हे रत्नागिरी येथे दौऱ्यावर आहेत. रत्नागिरी येथील शासकीय निवासस्थानी परब यांचा मुक्काम आहे. तर या ठिकाणापासून थोड्याच अंतरावर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे रत्नागिरीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण खबरदारी पोलिस प्रशासनाकडून घेतली जात आहे.
त्यामुळेच परब यांच्या सुरक्षेचा विचार करता पोलीस प्रशासनातर्फे निर्णय घेत त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना पन्नास पोलिसांचे सुरक्षा कवच पुरवण्यात आले असून तीन वरिष्ठ पोलीस अधिकारीही त्या ठिकाणी उपस्थित आहेत.