उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. अमृता फडणवीस यांना याआधी एक्स दर्जाची सुरक्षा होती. परंतु आता त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा मिळणार आहे. तसेच राज्य सरकारने ५१ आमदार आणि खासदारांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
बाळासाहेबांची शिवसेना यांच्या पक्षातील ४१ आमदारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तर दहा खासदारांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आमदार आणि खासदारांना वाय दर्जाची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशा दोन्ही पदाचा कार्यभार असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याने हा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना दिली जाणारी झेड प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे. तसेच राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा तेजस ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाय प्लस दर्जाची सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.
हे ही वाचा:
ट्विटरच्या ‘ब्लू टिक’साठी आता मोजावे लागणार पैसे
भगतसिंगांच्या फाशीचा प्रसंग साकारताना शाळकरी मुलाचा मृत्यू
मुंबई महापालिकेच्या कामांची होणार ‘कॅग’कडून चौकशी
मोरबी दुर्घटनेत १३२ लोकांचा मृत्यू, अनेकांना वाचवण्यात पथकाला यश
यासोबतच देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची सुरक्षेतसुद्धा वाढ करण्यात आली आहे. याआधी त्यांना एक्स दर्जाची सुरक्षा होती, ज्यामध्ये त्यांच्या सुरक्षेत एक पोलीस तैनात होता. परंतु आता त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा मिळणार असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी चार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. याशिवाय, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची झेड दर्जाची सुरक्षा कायम ठेवली आहे.