आज देशभरात विविध ठिकाणी रेल रोको होत आहे. त्यामुळे सुरक्षादल अधिक सतर्क झाले आहे. त्यापैकी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यात अधिक दक्षता बाळगण्यात येत आहे.
राज्य पोलिस दल, राज्य रेल्वे पोलिस दल, रेल्वे पोलिसांनी दुपारी बारा वाजल्यापासून सुरू झालेल्या रेल रोकोसाठी विशेष काळजी घेत आहेत. रेल रोको दुपारी चार वाजेपर्यंत चालणार आहे. रेल्वेने पोलिसांच्या २० अधिक तुकड्या उतरवल्या आहेत.
पलवल स्थानकाच्या जीआरपी स्टेशन इन-चार्ज भीम सिंग यांनी सांगितल्यानुसार आंदोलकांनी रेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात आली आहे. या स्थानकाच्या परिसरात एकूण ३००० सुरक्षा रक्षकांना तैनात करण्यात आले आहे.
त्यांनीच दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांना गाड्या अडवायला देण्यात येणार नाही. त्यांना रेल्वेच्या परिसरात शिरण्यापासून रोखण्यात येणार आहे.
दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) दिलेल्या माहितीनुसार टिकरी बॉर्डर, पंडित श्रीराम शर्मा, बहादुरगढ सिटी आणि ब्रिगेडियर होशियार सिंग स्थानकांचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
या व्यतिरिक्त आग्रा-मथुरा हायवेवर देखील मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी सांगितले की, रेल रोको शांततापूर्ण पद्धतीने पार पाडले जाईल. त्याप्रमाणे, या आंदोलनामुळे अडकून पडणाऱ्या लोकांना खाद्यपदार्थ पुरवले जातील. ट्रॅक्टर रॅली, चक्का जाम यानंतर आता शेतकरी आंदोलकांनी रेल रोकोचा अवलंब केला आहे.