आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली यादी समोर आल्यानंतर आता दुसरी यादी पक्षाकडून जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये एकूण ४३ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.यामध्ये आसाम, गुजरात, मध्यप्रदेश, उत्तराखंड, दीव-दमण आणि राजस्थानच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.काँग्रेसच्या यादीत तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांचा संधी देण्यात आली आहे.
मध्य प्रदेशच्या छिंदवाडामधून सध्याचे खासदार नकुलनाथ यांना तिकीट देण्यात आलं आहे.खासदार नकुलनाथ हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पूत्र आहेत.राजस्थानमध्ये जालौर मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे चिरंजीव वैभव गेहलोत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर आसामच्या जोऱ्हाट लोकसभा मतदारसंघातून गौरव गोगई यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.काल नवी दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस निवडणूक समितीची बैठक पार पडली होती.या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
काँग्रेसने जाहीर केलेल्या ४३ उमेदवारांमध्ये १३ उमेदवार ओबीसी आहेत तर १० अनुसूचित जाती, ९ अनुसूचित जमातीचे याशिवाय एक मुस्लिम उमेदवार आहे. काँग्रेसकडून राजस्थानच्या २५ जागांपैकी १० जागांसाठी उमेदवार घोषित केले आहेत. यामध्ये बिकानेर येथून गोविंद मेघवाल, चुरु येथून राहुल कस्वा, झुंझुनू येथून बृजेंद्र ओला, अलवर येथून ललित यादव, भरतपूर येथून संजना जाटव, टोंक येथून हरीश मीणा, जोधपूर येथून करण सिंह उचियारडा, जालौर सिरोही येथून वैभव गहलोत, उदयपूर येथून ताराचंद मीणा, चितौड येथून उदयलाल आंजना यांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
माध्यमांत आदिवासी पत्रकार कुठे आहेत, राहुल गांधींचा सवाल
सीएए बाबतीत अनेक आंतरराष्ट्रीय मिडीयाचा अपप्रचार
गुजरात: ४०० कोटी रुपयांच्या ड्रग्जसह सहा पाकिस्तानी लोकांना अटक!
हनीट्रॅप; माझगाव डॉकयार्डच्या अधिकाऱ्याला हेरगिरी प्रकरणी अटक
दरम्यान, ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या दिवशी काँग्रेसने पहिली यादी जाहीर केली होती, यात राहुल गांधी, शशी थरूर यांच्यासह ३९ उमेदवारांची नावे होती. आज जाहीर करण्यात आलेल्या यादीत ४३ उमेदवारांचा समावेश आहे, ज्यात १० उमेदवार राजस्थानमधून आहे.
तसेच मध्यप्रदेशातील १० जागांवर छिंदवाडा येथून नकुलनाथ, भिंड येथून फूल सिंह बरैया, टीकमगढ येथून पंकच अहिरवार, सतना येथून सिद्धार्थ कुशवाह, सीधी येथून कमलेश्वर पटेल, मंडला येथून ओंकार सिंह मरकाम, देवास येथून राजेंद्र मालवीय, धार येथून राधेश्याम मुवेल, खरगोन येथून पोरलाल खरते, बैतूल येथून रामू टेकाम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.दरम्यान, काँग्रेस पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी दोन याद्या जाहीर करण्यात आल्या, मात्र यामध्ये एकाही महाराष्ट्राच्या उमेदवाराचा समावेश नाही.