स्कॉटलँडच्या प्रमुख नेत्या निकोला स्टर्जन यांचे वक्तव्य
ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याच्या पार्श्वभूमीवर स्कॉटलँडच्या प्रमुख नेत्या निकोला स्टर्जन यांनी स्कॉलँडला पुन्हा एकदा युरोपियन महासंघात जोडले जाण्याची इच्छा असल्याचे व्यक्त केले आहे. “आम्ही आशा करतो की आम्ही लवकरच युरोपियन युनियनमध्ये जोडले जाऊ.” असे वक्तव्य निकोला स्टर्जन यांनी केले आहे.
“युरोपियन महासंघाचा स्वतंत्र सभासद या नात्याने स्कॉटलँड लवकरच युरोपियन महासंघात प्रवेश करेल आणि महत्त्वाच्या एक महत्त्वाचा दुवा ठरू.” असे स्टर्जन म्हणाल्या आहेत.
युरोपियन महासंघात राहण्याबाबत २०१६ मध्ये यु.के मध्ये सार्वमत घेण्यात आले होते. या सार्वमतात स्कॉटलँडमधील बहुमताचा कल युरोपियन महासंघात राहण्याकडे होता. मात्र युनायटेड किंगडमच्या सध्याच्या निर्ण्यामुळे स्कॉटलँड पुन्हा एकदा युनायटेड किंगडम मधून बाहेर पडण्याच्या हालचाली करू शकतो.
यापुर्वी २०१४ मध्ये स्कॉटलँडमध्ये युनायटेड किंगडममध्ये राहण्याबद्दल सार्वमत घेण्यात आले आहे. मात्र त्यावेळेच्या सार्वमतात स्वतंत्र होण्याचा निर्णय निसटत्या फरकाने फेटाळला गेला होता. तेव्हापासून स्कॉटिश नॅशनल पार्टीच्या प्रमुख नेत्या निकोला स्टर्जन या स्वातंत्र्याच्या दुसऱ्या सार्वमतासाठी जोरदार प्रयत्नशील आहे.
“स्कॉटलँडमधील अनेक लोकांना युरोपियन महासंघात राहून अधिकाधीक आपला विकास करून घेण्याची इच्छा आहे. मात्र ब्रिटनने युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे आम्हाला आता स्वतंत्र राष्ट्र म्हणूनच युरोपियन महासंघात राहता येईल”
मात्र स्वतंत्र राष्ट्र म्हणून युरोपियन महासंघात जाण्याचा स्कॉटलँडचा मार्ग अजिबात सुकर नाही. दरवर्षी स्कॉटलँडच्या आर्थिक तुटीत मोठी वाढ होत आहे. त्याबरोबरच स्वातंत्र्याचे सार्वमत घेण्यासाठी निकोला स्टर्जन यांना यु.के.चे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. तर जॉन्सन यांनी अशाप्रकारच्या कोणत्याही सार्वमताची शक्यता फेटाळून लावली आहे.