राज्याच्या राजकारणात सध्या महाविकास आघाडी सरकार विरुद्ध विरोधी पक्ष यांच्यात राजकीय वातावरण तापलेले असताना भाजपा नेते आणि आमदार अमित साटम यांनी मुंबई महानगर पालिकेचा भ्रष्ट कारभार उघड केला आहे. अमित साटम हे सातत्याने मुंबई पालिकेचे घोटाळे उघड करत असतात. दरम्यान अमित साटम यांनी आता पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पालिकेच्या निविदा प्रक्रियेत केंद्रीय सतर्कता आयोगाच्या सीव्हीसी मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्याचा आरोप अमित साटम यांनी केला आहे.
इलेक्ट्रिक बस खरेदीच्या निविदा प्रक्रियेत कंत्राटदारांसाठी २५ एप्रिल सायंकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती. त्यानंतर त्याच दिवशी ३ वाजून ३५ मिनिटाला अचानकपणे शुद्धिपत्रक काढण्यात आले आणि यात निविदा भरण्यासाठी कंत्राटदारांच्या पात्रता अटीच बदलण्यात आल्या. बदललेल्या पात्रता अटीत विदेशी कंपन्या आणि विदेशातील पात्रता अनुभवही ग्राह्य धरण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. ही अट अचानकपणे बदलणे कायदेशीर नाही, असे अमित साटम यांनी म्हटले. त्यामुळे या संपूर्ण निविदा प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
कोणा विशिष्ट परदेशी कंपनीला ही निविदा मिळावी असा उद्देश असल्याचा आरोप अमित साटम यांनी केला आहे. तसेच योग्य ती कारवाई करून निविदा प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवण्यात यावी असे अमित साटम यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
विम्बल्डन विजेता हॅण्डसम टेनिसपटू बोरिस बेकरला तुरुंगवास
पतियाळात ‘खलिस्तान मुर्दाबाद’चे नारे देणाऱ्या शिवसेना नेत्याचीच पक्षातून हकालपट्टी
खबरदार! वाकड्या नजरेने बघाल तर…
ऑइल बॉण्डमुळे पेट्रोल वाढीचे चटके
या निविदेची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून निविदाधारकांच्या विनंतीनुसार त्यांच्यासोबत बैठका घेऊन जागतिक पातळीवरच्या व्यवसाय संस्थांना या निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेता यावा, यादृष्टीने बेस्ट उपक्रमाने या निविदा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ केली आहे, असे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.