गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त शनिवारी देण्यात येत होते. पण सत्यपाल यांना अटक करण्यात आलेली नाही, असे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
जाट नेता म्हणून ओळख असलेले सत्यपाल मलिक यांचा सत्कार कार्यक्रम हरियाणा, राजस्थान, दिल्ली आणि पश्चिम उतर प्रदेशच्या खाप प्रतिनिधींमार्फत ठेवण्यात आला होता. दिल्लीतील आरके पुरम येथील सेक्टर १२ मधील सेंट्रल पार्क येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण सत्यपाल मलिक तिथे पोहोचल्यावर दिल्ली पोलिसांनी कार्यक्रमात भाग घेण्यापासून रोखले. तेथील तंबूही काढून टाकण्यात आला. खाप प्रतिनिधींच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती, पण ते सामानही विखुरण्यात आले होते. दिल्ली पोलिसांच्या मते या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची परवानगी संबंधितांनी घेतली नव्हती. त्यानंतर सत्यपाल मलिक हे पोलिस ठाण्यात गेले आणि तिथे त्यांनी धरणे धरले.
हे ही वाचा:
खासदारकी रद्द झाल्यामुळे राहुल गांधींनी २० वर्षांनी सोडला बंगला
खारघर मध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्र !
अखेर ३६ दिवसांनी अमृतपाल पोलिसांच्या जाळ्यात
घरच्या मैदानात अजित पवारांनी केली मुख्यमंत्रीपदाची दावेदारी…
दिल्लीतील पोलिस उपायुक्तांनी सांगितले की, सत्यपाल मलिक यांची मुले आरके पुरम भागात राहतात. सत्यपाल मलिक हे सार्वजनिक ठिकाणी बैठक घेत होते. जेव्हा पोलिस तिथे पोहोचले आणि त्यांना विचारणा केली की, या बैठकीसाठी परवानगी घेतली आहे का, सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यासाठी परवानगी आहे का, तर त्यांनी नाही असे सांगितले. त्यानंतर सत्यपाल मलिक आपल्या गाडीने पोलिस ठाण्यात आले. पोलिसांनी त्यांना बोलावले नव्हते किंवा ताब्यातही घेतले नाही.
सत्यपाल मलिक यांनी द वायर या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याबद्दल काही चुकीची वक्तव्ये केली. पुलवामा येथे शहीद झालेल्या ४० जवानांचा मृत्यू सरकारच्या निष्काळजीपणामुळे झाला असे सत्यपाल म्हणाले होते. आपल्याला पंतप्रधानांनी गप्प राहण्यास सांगितल्याचा आरोपही त्यांनी केला होता.