राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमी उत्सवात सध्या सर्वत्र गाजत असलेल्या ड्रग्सच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. ड्रग्सच्या व्यवहारातून मिळणार पैसे देश विघातक शक्ती वापरतात असा दावा सरसंघचालकांनी केला आहे. तर भारतीय मूल्य व्यवस्था मोडीत काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही भागवत यांनी म्हटले आहे.
भारत विकासाच्या वाटेवर निघाला आहे. पण ते होऊ नये, इथला समाज संघटित होऊ नये, हिंदू एक जूट न होता विभागलेला राहावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इथल्या कलहांवर ज्यांची दुकानदारी सुरू आहे. त्यांच्यामार्फत हे प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी जो जो भारतीय आहे त्याची निंदा केली जाते. जे जे भारतीय आहे त्याची निंदा केली जाते. भारतीय जीवनाची, भारतीय धर्माची, भारतीय परंपरांची, भारतीय इतिहासाची, भारतीय वर्तमानाची, भारतीय व्यवस्थेची सर्वांची निंदा करणे आणि स्वतःविषयी भारतीयांच्या मनात अश्रद्धा निर्माण करणे याचा प्रयत्न सुरू आहे.
प्राचीन काळापासून जग बघत आहे की भारतीय जीवन पद्धतीत मूल्य आहेत. ही मूल्ये मानवी जीवनाला सुख देतात. स्थिरता देतात. तुटण्यापासून वाचवतात अधःपतनापासून रक्षा करतात. अशा मूल्यांनी युक्त असलेले आपले जीवन आहे. या मुल्यांवरच हल्ला होत आहे. हा हल्ला बोलून केला जातो. निंदा करुन केला जातो. अनेकदा सूक्ष्म मार्गांनी केला जातो. अशी आक्रमणे सातत्याने सुरू आहेत. कारण भारतातील मूल्यव्यवस्था अशीच सुरू राहिली तर आपली दुकाने चालणार नाहीत याची त्यांना खात्री आहे. यासाठी एकत्रित प्रयत्न सुरू आहेत.
हे ही वाचा:
महाराष्ट्रातील सरकारी बंद विरोधात उच्च न्यायलायत याचिका
‘कलम ३७० हटवल्याचा सामान्य काश्मिरींना लाभ’ – सरसंघचालक
नवाब मलिकांच्या जावयाचा जामीन रद्द होणार?
अनेकदा निर्णय प्रक्रियेत असलेले लोक याचा विचार करताना दिसत नाहीत. राज्य राज्यांत संघर्ष पाहायला मिळतात. भारतातील एका राज्याचे पोलीस दुसऱ्याच्या पोलीसांसोबत संघर्ष करतात. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात संघर्ष पाहायला मिळतो. राजकीय पक्षांमधील संघर्ष समजू शकतो पण सरकारमधील संघर्ष योग्य नाही असे मत भागवत यांनी व्यक्त केले आहे.
त्यात इतर अनेक गोष्टी भर घालत आहेत असे सांगताना सरसंघचालकांनी ओटीटी प्लॅटफॉर्म आणि व्यसनाधीनतेचे उदाहरण दिले. आता लहान मुलांच्या हातात मोबाईल उपलब्ध झाले आहेत त्यावर ते काय बघतात यावर नियंत्रण नसते आणि ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर काय दाखवले जाते यावर नियंत्रण नसते. यासोबतच देशातील व्यसनाधीनता वाढत आहे. वेगवेगळे नशेचे पदार्थ बाजारात येत आहेत. ते कसे थांबवायचे हे माहित नाही. उच्चभ्रू वर्गापासून ते शेवटच्या समाज घटकापर्यंत समाजाच्या प्रत्येक स्तरावर व्यसनाधीनता वाढत आहे. या व्यापारातून येणारा पैसा देशविरोधी कार्यांसाठी वापरला जातो. त्यामुळे या सर्वांवर उपाययोजना गरजेच्या आहेत.
या सर्वाच्या संदर्भात काय योग्य? काय अयोग्य? काय चांगले? काय वाईट? ही शिकवण घरातून मिळत असते. घरातल्या संस्कारातून, चालीरितीमंडून मिळत असते. त्यासाठी कुटुंब प्रबोधनाची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.