एप्रिल महिन्यात होऊ घातलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आता उमेदवारांची नवे जाहीर करायला सुरवात केली आहे. काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष आणि इंडियन सेक्युलर फ्रंट (आयएसएफ) या तीन पक्षांनी साठ जागांवर उमेदवार घोषित केले आहेत.
कालच (५ मार्च) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने २९४ पैकी २९१ उमेदवार जाहीर केले होते. यामध्ये भवानीपूर या त्यांच्या पारंपरिक मतदार संघातून निवडणूक लढण्याऐवजी त्यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. नंदीग्राम मधून निवडणूक लाढवण्याच्या निर्णयामागे त्या विधानसभा मतदारसंघातील ३० टक्के मुस्लिम मतदार असल्याचे सांगितले जात आहे. येत्या निवडणुकीत ममता बॅनर्जींची मदार मोठ्या प्रमाणावर मुस्लिम मतांवर असल्याचे सांगितले जात आहे.
हे ही वाचा:
याच कारणामुळे संयुक्त मोर्चा (काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष, आयएसएफ युती) हा ममता बॅनर्जींसाठी मोठा धोका मानला जात आहे. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांनी २०१६ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील युती केली होती. परंतु येत्या निवडणुकांमध्ये आयएसएफने सुध्या या युतीमध्ये सामील होऊन संयुक्त मोर्चा उभारला आहे. आयएसएफचे नेते अब्बास सिद्दीकी हे फुरफुरा शरीफचे मौलवी आहेत. बंगालमधल्या ६० जागांवर त्यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते. आयएसएफशी युती केल्याने काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षाला मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणात मिळू शकतील असा अंदाज आहे.