“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ही तुमची प्रॉपर्टी नाही ते शिवसैनिकांचे दैवत”

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ही तुमची प्रॉपर्टी नाही ते शिवसैनिकांचे दैवत”

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबत असलेल्या आमदारांवर टीका केली. तसेच शिवसेनेचा बाप, बाळासाहेब ठाकरेंच्या नावाशिवाय निवडून येण्याचं आव्हान त्यांनी दिलं. तसेच शिवसेनेतून गेलेल्यांना पालापाचोळा असंही त्यांनी म्हटलं. यावर औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

“शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ही तुमची प्रॉपर्टी नाही. ते प्रत्येक शिवसैनिकांचं दैवत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांचं नाव सभेत घेतलं जातं. शिवसेना प्रमुखांची उंची तुम्ही कमी करू नका. त्यांच्या पुण्याईमुळे आम्ही घडलो आहोत. त्यांना तुम्ही एवढं छोटं कमी करण्याचा का प्रयत्न करताय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

राजकारण करायचं आहे तर स्वतःचा ठसा उमटवा. आजही पहिलं नाव छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर आणि नंतर बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतात. तर त्या व्यक्तीला खाली खेचायचं काम करू नका. शिवसेना प्रमुख ही तुमची प्रॉपर्टी नाही, ती प्रत्येक शिवसैनिकाचं दैवत आहे.

पानं गळालीत त्यांचा अपमान करू नका. आज आम्हीही पाहत आहोत. मनोहर जोशी, लीलाधर ढाके तुमच्याबरोबर बसलेले दिसत नाहीत. हे काळाबरोबर बदलत जातं. नव्यांचं स्वागत करा, पण आपल्या घरातल्यांना विसरू नका. तुम्ही शिवसैनिकांना पालापाचोळा म्हणू नका. या मोठ्यांच्या सावलीत तर आम्ही वाढलो या नेत्यांनी एकेका गावात-खेड्यात जाऊन शिवसेना रुजवायचं काम केलं. त्याला पाला पाचोळा म्हणता येणार नाही. उद्या तुम्हाला कुणी पालापाचोळा म्हटलं तर काय होईल? असा संतप्त सवाल संजय शिरसाट यांनी उपस्थित केला आहे.

हे ही वाचा:

सीएसएमटी स्थानकात लोकलचा डबा घसरला

विश्वासघात…पालापाचोळा…खंजीर…भाजपाचे कारस्थान…पुन्हा तेच; उद्धव ठाकरे यांची मुलाखत

मुंबईच्या धर्मेश बराईचा जलशक्ती मंत्रालयातर्फे सन्मान

पाचव्या मजल्यावरून चिमुरडी पडली! तिला कुणी झेलले?

आपण आजारी असताना एकनाथ शिंदेंनी बंड केल्याचा आरोप या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी केला. यावर संजय शिरसाट म्हणाले की, सत्तेत जाण्यासाठी शिंदे साहेबांनी हा उठाव केला नव्हता. त्यांच्याकडे नगरविकास सारखं महत्त्वाचं खातं होतं. उद्धव ठाकरे आजारी असताना घडलेला हा प्रकार केल्याचं ते सांगत आहेत. हे खोटं आहे. आम्ही त्यांच्या प्रकृतीसाठी अभिषेक केला. ही दोन वर्षांपासूनची प्रक्रिया आहे. ते बरे झाल्यानंतरही राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्हाला नको आहेत, असं आम्ही म्हटलं. पण आजही मुलाखतीतून त्यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच मोठं म्हटलंय, याचं वाईट वाटतं, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.

Exit mobile version