संजय राऊतांची ‘रोखठोक’ फेकाफेक

शेतकरी आंदोलनात जसा तिरंगा दिसतोय तसाच खलिस्तानी झेंडा सुद्धा दिसतोय आणि आता तर त्यावर भिंद्रानवाले सुद्धा झळकू लागला आहे. आंदोलकांच्या मुखात जसे ‘जय हिंद’ आहे तसेच भारत तोडायची भाषा करणाऱ्यांच्या सुटकेची मागणीही आहे. हे देशभक्तीच्या कोणत्या व्याख्येत बसतं ते संजय राऊतांनाच ठाऊक.

संजय राऊतांची ‘रोखठोक’ फेकाफेक

संजय राऊत सामनाच्या ‘उत्सव’ पुरवणीतून न चुकता जी ‘रोखठोक’ नावाची फेकाफेक करत असतात ते आजही त्यांनी ‘करून दाखवले’. आजच्या ७ फेब्रुवारीच्या रोखठोकचा मथळा ‘जयहिंद बोलणारे हजारो देशद्रोही’ असा आहे. या लेखाच्या माध्यमातून राऊतांनी त्यांच्या राकेश टिकैत सोबतच्या ‘भरतभेटीची’ कथा सांगितली आहे. वास्तविक संजय राऊत काय किंवा राकेश टिकैत काय हे एकमेकांबद्दल बोलणार म्हणजे ते ‘अहो रूपं अहो ध्वनि:’ याच प्रकारचे आहे. राऊत टिकैत यांना का भेटले? तर या प्रश्नाचे साधे उत्तर सरकार विरोध हे एकमेव आहे. त्यामुळे राऊतांना किंवा त्यांच्या पक्षाला शेतकऱ्यांचा फार कळवळा आहे असा आव त्यांनी उगाच आणू नये. ज्या शेतकरी कायद्यांवरून ही सगळी नौटंकी सुरु आहे ते कायदे पारित करण्यासाठी जेव्हा संसदेत मतदान झाले तेव्हा लोकसभेत आणि राज्यसभेत शिवसेनेने मतदानावर बहिष्कार घातला होता.

आंदोलकांच्या हातात तिरंगा आहे आणि मुखात ‘जय हिंद’ आहे म्हणून ते सगळे ‘राऊत सर्टिफाईड देशभक्त’ झाले आहेत. पण संजय राऊत हे सोयीस्करपणे विसरतात की सीतेवर हात टाकायला आलेला रावण येताना साधूच्या वेशातच येतो. २६/११ ला नरसंहार करणारा कसाब जेव्हा पाकिस्तानातून आला तेव्हा त्याच्या हातातही शिवबंधन सदृश्य धागाच होता. तो जर पकडला गेला नासता तर ह्या हल्ल्याचे खापर हिंदुत्ववाद्यांवर फोडण्याची संपूर्ण संहिता लिहून तयारच होती. शेतकरी आंदोलनात जसा तिरंगा दिसतोय तसाच खलिस्तानी झेंडा सुद्धा दिसतोय आणि आता तर त्यावर भिंद्रानवाले सुद्धा झळकू लागला आहे. आंदोलकांच्या मुखात जसे ‘जय हिंद’ आहे तसेच भारत तोडायची भाषा करणाऱ्यांच्या सुटकेची मागणीही आहे. हे देशभक्तीच्या कोणत्या व्याख्येत बसतं ते संजय राऊतांनाच ठाऊक. 

आपल्या दिशाभूल करणाऱ्या लेखात राऊत असे म्हणतात “चीन आणि पाकिस्तानशी चर्चा होते पण शेतकऱ्यांना ती संधी नाही.” मग केंद्र सरकारने चर्चेच्या ११ फेऱ्या ज्यांच्यासोबत केल्या ते कोण होते? ते शेतकरीच नव्हते असे राऊतांचे म्हणणे आहे का? २६ जानेवारीच्या दिवशी राजधानीत आंदोलकांनी हिंसाचार करूनही थेट देशाचे पंतप्रधान चर्चेची दारे बंद न करता चर्चेचे आमंत्रण देतात, हे पुरेसे नाही का?

पुढे राऊतांना असा प्रश्न पडतो की “हे सरकार पाकिस्तान आणि चीनशी काय लढणार?” हा प्रश्न बघता संजय राऊतांना बहुदा स्मृतिभ्रंशाचा आजार असावा अशी शंका मला येते. कारण पाकिस्तानच्या विरोधात ठाम भूमिका घेऊन सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक करण्याची ५६ इंची छाती याच सरकारने दाखवली आहे. आज जागतिक पटलावर स्थिती अशी आहे की इस्लामी देशांची आंतरराष्ट्रीय संघटना भारतीय परराष्ट्र मंत्र्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावते आणि त्यासाठी पाकिस्तानच्या बहिष्काराच्या धमक्यांना कोणीही जुमानत नाही. हे यश या सरकारच्या परराष्ट्रनीतीचेच आहे. चीन विरोधातही भारत सरकारची भूमिका ही ‘इट का जवाब पत्थर से’ असल्याचा प्रत्यय वेळोवेळी आला आहे. मग ते डोकलाम असुदे किंवा गलवान किंवा चीनची केलेली आर्थिक कोंडी, भारताने कायम चीनच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिले आहे. आज कोरोनाच्या महामारीमुळे चीनची जगात नाचक्की सुरु असताना भारत मात्र जगाला लसीचा पुरवठा करून जीवनदात्याची भूमिका बजावत आहे. त्यामुळे भारत सरकार पाकिस्तान आणि चीनशी कशाप्रकारे लढणार याची चिंता संजय राऊतांनी करण्याची गरज नाही. पण राऊतांना शक्यच असेल तर आज त्यांचा पक्ष ज्या काँग्रेस सोबत मांडीला मंडी लावून महाराष्ट्राची सत्ता उपभोगतोय त्या काँग्रेस पक्षाला प्रश्न विचारावेत. राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून देणगी का मिळते? एकीकडे डोकलामचा स्टॅन्ड ऑफ सुरु असताना राहुल गांधी चीनी राजदूतांना का भेटले? याची उत्तरे अजूनही देशाला मिळाली नाहीत.

एकेकाळी मराठी माणूस, हिंदुत्व वगैरेची भाषा करणारा सामना आता रिहाना,ग्रेटा यांची बाजू घेऊन मराठीची माणसाचे मानबिंदू असणाऱ्या लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांना अक्कल शिकवत आहे. परकीय शक्तींनी हायजॅक केलेले आंदोलन संजय राऊतांना देशहिताचे वाटत आहे. दिव्यदृष्टी लाभलेल्या संजय राऊत यांना दिल्लीत हिंसा करणाऱ्या आंदोलकांमध्ये देशभक्त दिसत आहेत. हा शरद पवार यांच्या संगतीचा परीणाम. या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचे कसब त्यांनाही आता चांगले जमू लागले आहे.

Exit mobile version