गडबडणारे सरकार आणि बडबडणारे राऊत

गडबडणारे सरकार आणि बडबडणारे राऊत

बुधवारी महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले. या अधिवेशनावर पूर्णपणे विरोधी पक्षाची पकड दिसून आली. महाराष्ट्रातील निरनिराळ्या प्रश्नांवरून आक्रमक होत विरोधकांनी सरकरचा कोथळा काढला. याचे निर्विवाद नायक होते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस. विरोधी पक्ष हे अर्थसंकल्प गाजवणार याचा अंदाज अधिवेशनापूर्वीपासूनच येत होता. विरोधकांचा झंजावात अधिवेशनाच्या आधी संजय राठोडांची खुर्ची तोडून गेला तर अधिवेशन संपताना एपीआय वाझेंना क्राईम ब्रँच मधून बाहेर भिरकावून गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तर विरोधकांची एवढी धास्ती घेतली की ते फारसे सभागृहात फिरकलेच नाहीत. कारण मुख्यमंत्री होऊन त्यांना एका वर्षापेक्षा अधिक काळ झाला असला तरीही अजून त्यांना सभागृहाच्या कामकाजाची पुरेशी जाण नाही, राज्यातील प्रश्नांचा अभ्यास नाही आणि आपल्या पदाचे गांभीर्य तर अजिबातच नाही. त्यामुळे नाक्यावरच्या भाषेत सभागृहात भाषण करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा अभ्यासू आणि मुत्सद्दी अश्या फडणवीसांसमोर निभाव लागणे शक्यच नव्हते. पण आपल्या नापास झालेल्या सरकारच्या कर्तृत्वाचे पोकळ उड्डाणपूल बांधायला संजय राऊतांची लेखणी सरसावली नसती तरच नवल!

शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ मधून संपादकीय लिहीत ‘विरोधी पक्ष काय करतोय?’ असा सवाल राऊतांनी केला आहे. खरं तर याचे साधे सोपे उत्तर आहे ‘विरोधी पक्ष सरकारचे वाभाडे काढत आहे.’ पण राऊतांना हे दिसणार नाही, दिसले तरी पटणार नाही आणि चुकून माकून पटलेच तर पचणार अजिबातच नाही. त्यामुळे राऊतांनी हे संपादकीय नेमके का लिहिले माहीत नाही. पण हा अग्रलेख म्हणजे शिवसेना पक्ष हा लोकभावनेपासून किती लांब गेला आहे याचे उदाहरण आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून नागरिक विरोधी पक्ष आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीवर कौतुकाचा वर्षाव करत असताना त्यांच्याविरोधात असा लेख लिहिणे म्हणजे फक्त मालकाला खुश करण्याचा प्रयत्न आहे.

हे ही वाचा:

आमदार गोपीचंद पडळकर सरकारवर बरसले

आफ्रिकेतून परत पाठवलेली लस?- अतुल भातखळकर

पश्चिम बंगाल पोलिसांची ममताच्या विरोधात ‘साक्ष’

भारतातील प्रमुख उद्योगपतींपैकी एक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटीनने भरलेली गाडी सापडते, या गाडीच्या मालकाचा संशयास्पद मृत्यू होतो आणि यात महाराष्ट्र पोलीस खात्यातील एक अधिकारी संशयित असतो. यावरून महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेचा जो बोजवारा उडाला आहे त्याचा अंदाज येतो. इथे कुंपणच शेत खात असल्याची परिस्थिती दिसून येते. या गंभीर प्रकरणाला विधानसभेत वाचा फोडली ती फडणवीस यांनीच! या प्रकरणाचे ‘वाझे कनेक्शन’ त्यांनीच उलगडले. आक्रमक झालेल्या फडणवीसांसमोर नांगी टाकलेल्या राज्य सरकारला इच्छेविरुद्ध वाझे यांच्या बदलीचा निर्णय घ्यायला भाग पडले. राऊतांनी कितीही नाकारायचा प्रयत्न केला तरीही हे विरोधी पक्षाचेच यश आहे.

एकेकाळचे शिवसैनिक असलेल्या वाझेंचे वकीलपत्र थेट मुख्यमंत्र्यांनीच घेतले असल्यामुळे राज्य सरकारपासून राऊतांपर्यंत सगळ्यांनाच वाझेंसाठी आपला वेळ, बुद्धी आणि लेखणी खर्ची घालणे भागच आहे. त्यासाठी अन्वय नाईक आणि मोहन डेलकर नावाच्या दोन ढाली सरकारने केल्या आहेत. राऊतांनी आपला अर्ध्यापेक्ष जास्त लेख यातच खर्ची घातला. अर्णब गोस्वामीला अटक केली म्हणून सचिन वाझे हे शिवसेनेला ‘सुपर कॉप’ वाटत असले तरी म्हणून त्यांची मनसुख हिरेन प्रकरणातील पापं धुतली जात नाहीत. मुख्यमंत्री मोहन डेलकरांच्या कुटुंबियांना भेटले पण मनसुख हिरेनच्या कुटुंबियांशी त्यांना संवाद साधावासा का वाटला नाही? राष्ट्रीय तपस यंत्रणेने अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओच्या प्रकरणात एन्ट्री केली आहे. पण संजय राऊतांना ही घुसखोरी वाटत आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या तपासात सचिन वाझेंविषयी काही मोठे हाती लागेल याची त्यांना भीती वाटते का?

अंबानींच्या घराबाहेरील गाडी आणि मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू या दोन्ही विषयांत राज्य सरकारची बाजू सुरवातीपासूनच लंगडी होती. त्यात वाझेंना पाठीशी घालण्याच्या नादात ते वेळोवेळी गडबडलेले दिसले. अन्वय नाईक, मोहन डेलकरांचा विषय पुढे करणे असो किंवा वांझेची बदली करणे असो. सरकारची गडबड दिसून येत आहे. अशातच राऊतांची बडबडही सुरु झाली आहे. विरोधी पक्षाने कसे नीट काम केले नाही हे सत्ताधारी पक्षाच्या मुखपत्राला सांगायची वेळ येणे ही एकप्रकारे विरोधी पक्षाच्या कामाची पोचपावती म्हणावी लागेल. कारण विरोधी पक्षाने एवढी उल्लेखनीय कामगिरी केली आहे की त्यावरून दिशाभूल करण्याचा प्रयत्न राऊतांना करावा लागत आहे.

काल माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की “सचिन वाझे सरकार हलवू पण शकतात आणि घालवू पण शकतात.” गडबडणारे सरकार आणि बडबडणारे राऊत हे त्याचीच साक्ष देत आहेत.

Exit mobile version