विधान परिषदेच्या सदस्यांच्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना फटकारले आहे. राऊतांची राज्यपालांविरोधातील टीका म्हणजे निव्वळ पोरखेळ आहे. त्याला काय उत्तर द्यायचं?, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांचा समाचार घेतला आहे.
संजय राऊत यांना काही कामधंदा नाही. ते दिवसभर काहीबाही बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर थोडीच उत्तर द्यायचं असतं, असं सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.
राजभवनात कोणतं भूत आहे? विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्तीच्या फायली कोणत्या भुताने पळवून नेल्या?, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर राजभवनातील विधान परिषदेच्या आमदारांच्या यादीबाबत राजभवनच उत्तर देईल. त्यावर मी बोलू शकत नाही. पण भुताटकी, भुताचा वावर ही कसली विधाने आहेत. हा निव्वळ पोरखेळ आहे. असा पोरखेळ कुणीही करू नये, अशी टीका फडणवीस यांनी केली.
मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजी छत्रपती राज्याचा दौरा करणार आहेत. त्यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संभाजी छत्रपती यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. ते २८ मे रोजी मला भेटणार आहेत. त्यावेळी मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा करण्यात येईल, असं ते म्हणाले.
हे ही वाचा:
देशात पाच हजार पेक्षा जास्त काळ्या बुरशीचे रुग्ण
वडेट्टीवारांना ओबीसी नेता होण्याची घाई, त्यांच्या बोलण्याला काडीचीही किंमत नाही
मराठा मूक मोर्चा आता ‘बोलका’ होणार?
दरम्यान, राऊत यांनी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातूनही राज्यपालांवर केलेल्या टीकेला विरोधकांकडून उत्तरं मिळू लागली आहेत. राज्यपालांनी करावीत अशी अनेक कामे आहेत. फायलींवर बसून राहण्यापेक्षा ही कामे केल्याने त्यांचा नावलौकिक वाढेल. महाराष्ट्रात लसीचा तुटवडा आहे. याबाबत राज्यपालांनी केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे. ‘तौकते’ चक्रीवादळात नुकसान झाले. पंतप्रधानांनी गुजरातच्या वादळग्रस्तांना हजार कोटी दिले. मग महाराष्ट्रावर अन्याय का करता? माझ्या राज्यालाही पंधराशे कोटी द्या, अशी मागणी करून राज्यपालांनी ‘मऱ्हाटी’ जनतेची मने जिंकली पाहिजेत. हे सर्व करायचे सोडून राज्यपाल सहा महिन्यांपासून एका फाईलचे राजकारण करीत आहेत. आता तर ती फाईलही भुतांनी पळविली. राजभवनात अलीकडे कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे? एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल! असा सल्ला ‘सामना’तून देण्यात आला होता.