मुंबई महापालिकेतील कोविड घोटाळयाप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना ईडीने अटक केल्याची माहिती समोर आली आहे. करोना काळात मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मुंबईत अनेक ठिकाणी जम्बो कोविड सेंटर्स उभारण्यात आले होते. त्यावेळी मुंबई महापालिकेकडून कोविड सेंटर्सचे कॉन्ट्रॅक्ट पात्रता नसलेल्या कंत्राटदारांना देण्यात आले होते. यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेत हा मुद्दा उचलून धरला होता. सुजीत पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्यामुळे पाटकर यांच्या अटकेमुळे संजय राऊत यांना मोठा धक्का बसल्याच्या चर्चा आहेत. सुजित पाटकर यांना आता न्यायालयात हजर करणार असल्याची शक्यता आहे.
ईडीने गुरुवार, २० जुलै रोजी सकाळी सुरज पाटकर यांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करून त्यांच्या कोठडीत वाढ मागण्याची शक्यता आहे. सुजित पाटकर यांनी १०० कोटींचा घोटाळा केला होता, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याची दखल घेत ईडीने चौकशी केली होती. या प्रकरणी सुजीत पाटकर यांचीही चौकशी करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या घरावर छापेमारीही करण्यात आली होती. या प्रकरणी डॉ. किशोर बिचुले यांनाही अटक करण्यात आली आहे.
सुरज चव्हाण ईडीच्या रडारवर?
गेल्या महिन्यात ईडीने शिवसेनेचे पदाधिकारी सुरज चव्हाण यांच्यासह १५ जणांच्या घरावर मुंबई आणि पुण्यात छापे मारले होते. यात महापालिकेच्या तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांचाही समावेश होता. सुरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी धाड टाकत त्यांची चौकशीही करण्यात आली होती. त्यामुळे आता ईडीने पाटकर यांना अटक केल्यामुळे सुरज चव्हाण यांच्यावरही अटकेची टांगती तलवार असल्याच्या चर्चा आहेत.
काय आहे प्रकरण?
करोना काळात लाईफलाईन कंपनीने वैद्यकीय साहित्य खरेदीत घोटाळा केला होता. हा १०० कोटींचा घोटाळा होता. ही कंपनी सुजीत पाटकर यांची होती. वाढीव दरात वैद्यकीय साहित्य खरेदी करण्यात आले होते. आरोग्य क्षेत्रातील कोणत्याही कामाचा अनुभव नसतानाही लाईफलाइन कंपनीला टेंडर देण्यात आले होते. पैसे मिळविण्यासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांच्या संख्येत फेरफार केल्याचा आरोप ईडीने केला आहे. कोविड सेंटरचे कंत्राट घेतलेल्या लाईफलाईन कंपनीने पेपर्सवर दाखवलेले डॉक्टर्स आता अस्तित्वातच नाहीत, असं ईडी चौकशीतून समोर आले आहे.
हे ही वाचा:
मणिपूरच्या घटनेमुळे मोदी संतापले
इर्शाळवाडी दुर्घटना: मदतकार्यावर मुख्यमंत्र्यांचे ऑन फिल्ड उपस्थित राहून लक्ष
इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त जखमींची अदिती तटकरेंनी घेतली भेट
मणिपूरमधील क्रूरता; दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार
शिवसेना खासदार संजय राऊत हे भागीदार असलेली लाईफलाईन हॉस्पिटल मेनेजमेंट सर्व्हिस कंपनी अस्तित्वातच नाही. तरीही कोविड सेंटरचे कंत्राट या कंपनीला देऊन तब्बल १०० कोटींचा जम्बो कोविड घेटाळा केल्याचा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.