शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या भीतीने चांगलीच धडकी भरलेली दिसते. बुधवार, ९ फेब्रुवारी रोजी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. ईडी ही क्रिमिनल सिंडिकेट चालवत असून महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भावपूर्वक कारस्थान केले जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी यासंदर्भात देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती वेंक्कया नायडू यांना पत्र दिले आहे.
काय लिहिले आहे पत्रात?
शिवसेनेने भाजपाशी युती तोडल्यापासून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असून शिवसेनेच्या नेत्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना, मित्र परिचीतांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे. त्यांना त्रास देण्याच्या हेतूने दशकांपूर्वी झालेल्या व्यवहारांचा तपास सुरू असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महिनाभरापूर्वी मला काही लोक भेटले आणि महाराष्ट्रातले सरकार पाडण्यासाठी मला ऑफर देण्यात आली असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. यावेळी नकार दिला तर त्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल अशी वॉर्निंगही मला देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी आणि माझ्यासोबत महाराष्ट्रातील दोन मोठे नेते आणि दोन कॅबिनेट मंत्री यांना जेलमध्ये टाकण्याची धमकीही देण्यात आल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
तर आपल्या मुलीच्या लग्नाच्या खर्चाचीही चौकशी केली जात असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. या लग्नातील सजावट करणाऱ्या लोकांना बोलावून त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. तर माझ्या विरोधात जबाब देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचाही आरोप राऊतांनी केला आहे. या सजावट करणाऱ्यांना मी पन्नास लाख रुपये दिले असल्याचे त्यांनी कबूल करावे असा दबाव टाकला जात आहे असा दावा राऊतांनी केला आहे. तर निष्पाप, निर्दोष मुंबईकरांना हे अधिकारी त्रास देत असल्याचे म्हटले आहे.
हे ही वाचा:
‘काँग्रेसचे नाव बदलून माय-लेकाची काँग्रेस असे करा’
काँग्रेस नसती तर…पंतप्रधानांनी काढले काँग्रेसचे वाभाडे!
गौतम अदानी बनले आशियाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती…
कर्नाटकात जय श्री राम विरुद्ध अल्ला हू अकबर वाद पेटला
सत्ता वसुली संचालनालय आणि इतर यंत्रणांनी आत्तापर्यंत २८ जणांना बेकायदेशीर पद्धतीने ताब्यात घेतले असून त्यांना कार्यालयात बसवून धमकावण्यात आल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यांनी माझ्या विरोधात जबाब नोंदवला नाही तर त्यांना घरी जाऊ दिलं जाणार नाही असे धमकावण्यात येत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या संदर्भातच आज सकाळी पत्रकारांशी बोलताना राऊत आक्रमक झालेले पाहायला मिळाले. यावेळी मुंबई पोलिसांनी या केंद्रीय तपास यंत्रणांच्या वसुली एजंटला धडा शिकवला पाहिजे अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केले. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही संजय राऊतांनी इशारा दिला आहे. आमच्या घरात शिरलात तर आम्ही तुम्हालाही तुमच्या घरी शिरू देणार नाही असे राऊत यांनी म्हटले आहे. तर आगामी काळात मुंबईत या संदर्भात सविस्तर पत्रकार परिषद घेणार असून एडी कार्यालयाच्या बाहेरही एक पत्रकार परिषद घेणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले आहे.