जवळपास १०० दिवस तुरुंगवासात काढल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बातचीत केली मात्र त्यात त्यांनी शिंदे फडणवीस सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले आणि त्यांना भेटण्याचीही इच्छा व्यक्त केली.
संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ प्रकरणात आरोप ठेवण्यात आले होते. त्यानंतर ईडीने त्यांना अटक केली होती. विशेष पीएमएलए न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर ते बाहेर आले आणि प्रथमच पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.
संजय राऊत यांना विचारलेल्या प्रश्नांवर ते म्हणाले की, शिंदे फडणवीस सरकारने काही चांगली कामे केली आहेत, त्याबद्दल त्यांचे कौतुक. विरोधासाठी केवळ विरोध करणे योग्य नाही. ज्या गोष्टी राज्यासाठी चांगल्या आहेत, त्या केल्या पाहिजेत. चांगल्या निर्णयांचे स्वागतही व्हायला हवे.
हे ही वाचा:
अफझलखानाच्या मृत्यूदिनीच त्याच्या कबरीभोवतालच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा
अडवाणी, जोशी आणि उमा भारती यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधातील याचिका फेटाळली
आयटम गर्ल राखी सावंत सह दोघीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल
फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऐपमध्येही आता नोकर कपात
संजय राऊत यांनी या दिलेल्या उत्तरांमुळे ते नरमले आहेत का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. अटक होण्यापूर्वी झुकेगा नही असा पवित्रा घेणारे संजय राऊत पत्रकार परिषदेत मात्र नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या प्रती आक्रमक नव्हते.
तुरुंगातील दिवस कसे होते, या प्रश्नावर त्यांनी चक्क स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे उदाहरण दिले. स्वातंत्र्यवीर सावरकर १० वर्षे कसे तुरुंगात राहिले असतील, लोकमान्य टिळक, आणीबाणीच्या काळात वाजपेयी यांनी तुरुंगात कसे दिवस काढले असतील याची कल्पनाच करू शकतो. राजकारणात अशी तुरुंगात जाण्याची वेळ येऊ शकते, माझ्यावरही ती आली, असेही ते म्हणाले.
राऊत यांनी सांगितले की, कुणाला चुकीच्या आरोपाखाली तुरुंगात टाकले तर ती चूक आहे. माझ्याबाबतीच नव्हे तर कुणाच्याही बाबतीत. कालच्या आदेशाममुळे न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढला आहे. पण आपण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनाही भेटणार आहोत. एवढेच नव्हे तर सगळ्यांना भेटू. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांचीही आपण भेट घेऊ. गृहमंत्री अमित शहा यांना भेटून त्यांनाही आपल्याबद्दल सांगू.
मुख्यमंत्री हे कुठल्याही पक्षाचे नसतात, पंतप्रधान कुठल्याही पार्टीचे नसतात, ते देशाचे राज्याचे असतात, असे सांगत त्यांनाही भेटणार असल्याचे राऊत म्हणाले.
राऊत यांनी राज ठाकरे यांचाही उल्लेख केला, ते म्हणाले की, राज ठाकरे यांनी एका भाषणात माझ्यावर टीका केली होती. राऊत यांना अटक होईल, एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करावी असे ते मला म्हणाले होते. मला ईडीने अटक केली ती बेकायदेशीर होती हे कोर्टाने म्हटले आहे. पण राजकारणात शत्रूच्या बाबतीत अशी भावना व्यक्त करू नये, सावरकरही एकांतात राहिले. आपण एकांतातील काळ सत्कारणी लावला. सरकार घटनाबाह्य आहेच, पण त्यांचे मोजके निर्णय चांगले आहेत.
भारत जोडो यात्रेत सहभागी होणार नाही
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रात आलेल्या भारत जोडो पदयात्रेत आपण सहभागी होणार नाही, अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे. आपली तब्येत ठीक नाही, त्यामुळे आपण यात्रेत सहभागी होणार नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले.